नागपुरात येणा-या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक

आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती : नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’

tukaram mundhe

नागपूर, ता. २८ : विमान, रेल्वे, बस, खासगी वाहन अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून नागपूर शहरात येणा-या प्रवाशांना शासनाच्या दिशानिर्देशानुसार १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. गृह विलगीकरणाचा शिक्का मारलेली कोणतिही व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्याला मनपातर्फे ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

लॉकडाउनमध्ये शहराबाहेर अडकलेले किंवा कामानिमित्त शहरात येउ पाहणारे लोक आता नागपुरात परतत आहेत. विविध माध्यमातून हे प्रवासी शहरात दाखल होत आहेत. मात्र शहरात आल्यानंतर त्यांना ‘होम क्वारंटाईन’ करणार की ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करणार हा अनेकांमध्ये संभ्रम आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाने दिशानिर्देश जारी केले असून त्यानुसार शहरात येणा-या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारण्यात येणार असून त्याला १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. यासाठी मनपातर्फे संबंधित व्यक्तीच्या घराबाहेर पोस्टर लावले जाईल. त्यामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव नमूद करून ‘ही व्यक्ती ‘होम क्वारंटाईन’ असून बाहेर कुठेही फिरताना आढळल्यास मनपाच्या नियंत्रण कक्षात ०७१२-२५६७०२१ आणि ०७१२-२५५१८६६ या क्रमांकावर नागरिकांनी माहिती दयावी, तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित व्यक्तीला मनपाच्या विलगीकरण कक्षामध्ये नेण्यात येईल, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

गृह विलगीकरणामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वत:सह आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे त्यांनी घराबाहेर निघू नये. त्यांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास असा कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास त्यांनी तात्काळ मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा आपल्या जवळच्या खाजगी किंवा शासकीय दवाखान्यात जाउन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.

शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्येही नागरिकांना उपचार घेता येणार आहे. खाजगी दवाखान्यांमध्ये ताप, खोकला, निमोनिया किंवा तत्सम लक्षणे असलेले रुग्ण आल्यास संबंधित डॉक्टरांनी त्या रुग्णाचे ‘स्वॅब’ घ्यावे व त्याचा अहवाल येईपर्यंत रुग्णाला आयसोलेशनमध्येच ठेवावे. ‘स्वॅब’चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याची माहिती तात्काळ मनपाला देण्यात यावी. संबंधित रुग्णावर त्वरीत उपचार केले जाईल, असेही आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

Also Read- नागपुरात ‘टीम वर्क’ मुळेच कोरोना नियंत्रणात : पोलीस आयुक्त उपाध्याय