नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठीचे संसदीय सत्र आजपासून ( दि. २९ ) सुरु होत आहे. कोरोनामुळे या सत्रात सुरक्षेसाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सभागृहात सादर करण्यात येणार आहे. हे अधिवेशन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. नव्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी सध्या दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडला आहे. त्यातच २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात ही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने होणार आहे. कोरोनाच्या कडक नियमांमुळे सामाजिक अंतर ठेऊनच हे अभिभाषण होणार आहे. यासाठी दोन्ही सभागृहातील सदस्य हे तीन वेगवेगळ्या ठिकाणी बसून हे अभिभाषण ऐकतील. मात्र केंद्र सरकारने नवे कृषी कायदे चर्चा न करता संमत केले आणि त्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली, याचा विरोध १७ विरोधी पक्ष राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणार आहेत. ही माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी दिली.
दरम्यान, अधिवेशनासाठी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. राज्यसभेच्या जवळपास १२०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली आहे. त्यापैकी कोणाचीही चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनीही कोरोनाची चाचणी करुन घेतली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहचला असताना संसदेचे पावसाळी अधिवेशन झाले होते पण, ते अत्यंत कमी कालावधीत गुंडाळण्यात आले होते. हिवाळी अधिवेश तर रद्द करण्यात आले होते. त्यामुळे संसदेच्या या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
पावसाळी अधिवेशनात आठवड्याच्या सुट्टीतही संसद सुरु होती. पण, आता तसे होणार नाही. याचबरोबर पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यात आला होता. आता मात्र तो पुन्हा प्रस्थापित करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेश सुरु होण्यापूर्वी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. यावेळी लोकसभेचे १७ सदस्य आणि राज्यसभेचे ८ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर १० दिवसांच्या सत्रात अनेकांना कोरोनाची लागण झाली होती.