नवी दिल्ली : पाकिस्ताननं पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारं काम केल्याचं समोर आलंय. तुर्कस्तानच्या एका विमानानं प्रवास करणाऱ्या एका भारतीय प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्यानं या फ्लाईटचं लाहोर विमानतळावर एमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आलं होतं. परंतु, पाकिस्तानकडून उपचारास नकार देण्यात आल्यानं या प्रवाशाला तब्बल सात तासांनंतर दिल्ली विमानतळावर उपचार उपलब्ध झाले. या घटनेची तक्रार रुग्णाच्या सहकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परदेश मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करून केलीय.
तुर्की एअरलाईन्सच्या विमानात विपिन नावाचा युवक आपल्या काही कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत प्रवास करत होता. एका वीमा कंपनीत काम करणारा विपिन सेल्स मॅनेजर पदावर काम करतो. कंपनीकडून आपल्या ७०-८० कर्मचाऱ्यांना तीन दिवसांच्या पर्यटनासाठी तुर्कस्तानला पाठवण्यात आलं होतं. यामध्ये विपिन आणि त्याचा मित्र पंकज मेहता हेदेखील होते.
पंकजनं दिलेल्या माहितीनुसार, सर्व जण १२ ऑगस्टला रात्री ८.३० दरम्यान इस्तम्बूलहून दिल्लीसाठी तुर्की एअरलाईन्सच्या विमानानं रवाना झाले. प्रवासादरम्यान अचानक विपिननं १० वाजल्यादरम्यान वाईन घेतली होती. त्यानंतर जवळपास रात्री १.०० वाजता त्याला उलटी झाली आणि चक्कर येऊन तो कोसळला. त्यानंतर रात्री विमानानं लाहोर विमानतळावर एमर्जन्सी लँन्डींग केलं. पाकिस्तानी डॉक्टर लगेचच दाखल झाले… त्यांनी विपिनला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला.
अशावेळी पायलटनं पाकिस्तानी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु, अधिकाऱ्यांनी विपिनच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत हॉस्पीटलमध्ये भरती करण्यास नकार दिला… यामध्ये जवळपास तीन तास वाया गेले.
भारताशी संबंध खराब असल्याच्या कारणानं पाकिस्तान सरकार आणि इमीग्रेशन विभागानं रुग्णाला उपचार देण्यास नकार दिल्याची घोषणा पायलटला करावी लागली.. त्यानंतर सकाळी ४.३० वाजल्याच्या सुमारास विमानानं दिल्लीसाठी उड्डाण घेतलं… त्यानंतर सकाळी ८.३० वाजता विमान दिल्लीला पोहचल्यानंतर विपिनला वेदांता हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या विपिनची तब्येत स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय.
हेही वाचा : पाकिस्तान ने स्वतंत्रता दिवस से पहले 30 भारतीय कैदियों को किया रिहा