नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात आरोग्य सुविधा कमी पडली. शहरातील रुग्णालयात ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नव्हते. बेडसाठी रुग्णांना भटकंती करावी लागली. मागील काही दिवसात रुग्णांची संख्या कमी झाली. बेड उपलब्ध होत आहे. परंतु धोका अजूनही टळलेला नाही. त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरता रुग्णांना उपचार मिळावे यासाठी महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे. ऑक्सिजन बँक व ऑक्सिजन कॉलिंग सेंटरची निर्मिती करण्याचे नियोजन सुरू आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्यतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टास्क फोर्स गठित करण्यात आला असून, त्यांच्या सूचनेनुसार नियोजन सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
१६ ते २२ एप्रिलदरम्यान १,०४,४६० चाचण्या झाल्या. ३२,६४६ रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. ही टक्केवारी ३१.२५ टक्के इतकी होती. जी दुसऱ्या लाटेत सर्वाधिक गणली गेली. यानंतर मात्र पॉझिटिव्हिटीच्या टक्केवारीत घट व्हायला सुरुवात झाली. परंतु संकट अजूनही कायम आहे. रुग्णांची संख्या कमीअधिक होत आहे. प्रशासन दोन-तीन पद्धतीने तयारी करीत आहे. सुपरस्प्रेडर्सचे ट्रेसिंग व टेस्टिंग अधिकाधिक करण्याची मोहीम राबविली जात आहे. कंटेन्मेन्ट झोनमध्ये टेस्टिंग केले जात आहे. अधिकाधिक लसीकरण कसे होईल याचे नियोजन सुरू आहे. ४५ वर्षांवरील ५७ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सोबतच शहरातील बेडची संख्या वाढविली जात आहे.
टास्क फोर्सच्या सूचनांनुसार नियोजन तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेता उपाययोजना करण्यासाठी टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे. त्यांच्या सूचनेनुसार नियोजन केले जाईल. सध्या ७७४५ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहे. यात पुन्हा वाढ केली जात आहे. लहान मुलांसाठी मनपा रुग्णालयात स्वतंत्र बेडची व्यवस्था केली जात आहे. शासकीय रुग्णालयातही २०० बेडचे नियोजन असल्याची माहिती राधाकृष्णन बी. यांनी दिली.
ऑक्सिजन बँकेतून मागणीनुसार पुरवठा नागपूर शहरात एप्रिल महिन्यासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी ऑक्सिजन बँक निर्माण केली जात आहे. यासाठी ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले जातील. याव्दारे मागणीनुसार ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जाईल. रुग्णांना ऑक्सिजनसाठी भटकंती करावी लागणार नाही यासाठी नियोजन केले जात आहे.
ऑक्सिजन कॉलिंग सेंटर महापालिकेच्या २८ हेल्थपोस्ट सेंटरवर ऑक्सिजन कॉलिंग सेंटर सुविधा उपलब्ध केली जाईल. येथे कॉन्सन्ट्रेलर उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे शहराच्या विविध भागातील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध न झाल्यास येथे उपचार उपलब्ध होतील.