नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मिळून कोविड पॉझिटिव्हचे ३३९ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील ३०९ रुग्णांना लक्षणेच नाहीत. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही बाब समाधानकारक आहे. सोमवारी १४ कोरोनाबाधितांची भर पडली, तर अमरावती येथील दोन रुग्णांचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. रुग्णसंख्या १,३१२ तर मृत्यूसंख्या २१वर पोहचली आहे. न्यू गाडगेबाबानगर व बैरामजी टाऊनमध्ये पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली.
नागपूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असले तरी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही फार कमी आहे. मेडिकलमध्ये सध्या कोविडचे १९३ रुग्ण उपचार घेत असून १६९ रुग्णांना लक्षणेच नाहीत. २४ रुग्णांनाच लक्षणे आहेत. मेयोमध्ये १४६ रुग्ण उपचार घेत असून १४० रुग्णांना लक्षणे नाहीत. सहा रुग्णांना लक्षणे आहेत. एकूण ३०९ रुग्णांमधून ३० रुग्णांना लक्षणे आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत ८.८४ टक्के रुग्णांना लक्षणे आहेत. ‘आयसीएमआर’च्या मागदर्शक तत्त्वांनुसार या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याचा सूचना आहेत. परंतु नागपुरात सध्यातरी असे सेंटर नाही. यामुळे हे रुग्ण मेयो, मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ‘एचडीयू’मध्ये उपचार घेत आहेत.
२२ दिवसात सात मृत्यू
मंगळवारी मेडिकलमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने गेल्या २२ दिवसांत सात मृत्यूची नोंद झाली आहे. आज मृत्यू झालेल्यामध्ये एक ३६ वर्षीय अमरावती येथील आहे. हा रुग्ण नागपूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला होता. रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह येताच मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. दुसराही मृत अमरावती येथील आहे. ७५ वर्षीय हा रुग्ण ‘सारी’वरील उपचारासाठी मेङिकलमध्ये दाखल झाला होता. उपचार सुरू असताना रुग्णाचा मृत्यू झाला.
खासगी लॅबमधून वाढत आहेत रुग्ण
खासगी प्रयोगशाळेतून (लॅब) पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज आठ रुग्णांची नोंद झाली. यात न्यू गाडगेबाबानगर येथील दोन, बैरामजी टाऊन येथील एक, बडनेरा येथील एक, लता मंगेशकर हॉस्पिटलमधील एक तर तीन रुग्ण वणी या ग्रामीण भागातील आहेत. मेयोच्या प्रयोगशाळेत चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात सिम्बॉयसिस क्वारंटाईन सेंटरमधील एक, व्हीएनआयटी सेंटरमधील एक, हिंगणा येथील एक तर एक रुग्ण मेयोमधील आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेला एक तर एम्सच्या प्रयोगशाळेतून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला, अशा १४ रुग्णांची नोंद झाली.
एका भिकाऱ्यासह ३४ रुग्णांना डिस्चार्ज
मेडिकलमधून २० रुग्ण बरे झाले. यात अमरनगर, नाईक तलाव-बांगलादेश, टेकडीवाडी, हंसापुरी, भानखेडा येथील आहेत. मेयोमधून ११ रुग्णांना डिस्चार्ज म्हणजे सुटी देण्यात आली. यात कळमेश्वर, नाईक तलाव-बांगलादेश, अजनी रेल्वे क्वॉर्टर येथील रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गंभीर अवस्थेत मेयोच्या कोविड ओपीडीसमोर पडून असलेला भिकारीही बरा झाल्याने त्यालाही रुग्णलयातून सुटी देण्यात आली. एम्समधून तीन रुग्णांना सुटी देण्यात आली. यात दोन नाईक तलाव तर एक रुग्ण पोलीस लाईन टाकळी येथील आहे. आज ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९०५ झाली आहे.