नागपुर :- देशातील विविध पोस्टल सर्कल मधील कर्मचा-यांसाठी आयोजित अखिल भारतीय कॅरम स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पोस्टल सर्कलतर्फे 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2018 दरम्यान नागपूरमध्ये आमदार निवास, सिविल लाईन्स येथील परिसरात केले जाणार आहे. ही 23 वी स्पर्धा असून प्रथमच नागपूरात आयोजित होत आहे, अशी माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल श्री. रामचंद्र जायभाये यांनी स्पर्धेच्या आयोजनासबंधीच्या पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे सहायक संचालक श्री. शशिन राय प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन 6 ऑगस्ट सकाळी 9 वाजता जी.पी.ओ. बिल्डिंगमधील ‘राजहंस’ सभागृह येथे प्रख्यात माजी भारतीय क्रिकेटपटू व विदर्भ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत वैद्य यांच्या हस्ते होणार असून जीवन बिमा मंडळाचे (एल.आय.सी.) प्रादेशिक व्यवस्थापक श्री. एम. सी. जोशी याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. महाराष्ट्र पोस्टल सर्कलतर्फे आयोजित या स्पर्धेचे यजमानपद नागपूर टपाल विभागाला दिले असून या स्पर्धेत 42 महिला व 92 पुरूष खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये 15 पोस्टल सर्कलचे खेळाडू पुरूष एकल, पुरूष दुहेरी, पुरूष संघ, महिला एकेरी, महिला दुहेरी, महिला संघ या गटासाठी कॅरमच्या स्पर्धेत सहभाग घेतील.
मागच्या वर्षी आयोजित कॅरम स्पर्धेत महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या संघाने पुरूष कॅरम स्पर्धेत चौथा क्रमांक व महिलांच्या कॅरम स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावला होता तर तामिळनाडू पोस्टल सर्कलने पुरूष व महिला या दोन्ही विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. यावर्षीच्या स्पर्धेतही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कॅरम स्पर्धा खेळणारे पोस्टल कर्मचारी सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा समारोप हा 10 ऑगस्ट रोजी राजहंस’ सभागृह येथेच सायंकाळी 4 वाजता आयोजित होणार असून नागपूरचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे बुद्धिबळपटू अनुप देशमुख व स्टेट बँक ऑफ इंडीयाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. फनिश गुप्ता उपस्थित राहतील. या स्पर्धेच्या विजेत्यांना सुवर्ण, रजत व कास्य पदक तसेच पुरुष, महिला व सांघिक खेळगटाच्या विजेत्यांना 3 चषकही दिले जाणार आहेत.
हेही वाचा : गणेश मंडळांना मिळणार विना विलंब परवानगी : मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह