नागपूर : मस्तिष्क पेशी मृत झाल्याने अनंताच्या प्रवासाला निघालेल्यांच्या नातेवाइकांनी मनाचा मोठेपणा दाखविल्याने देशभर शेकडो जणांच्या आयुष्यात उमेदीची किरणे पेरण्यात यश आले. या महाअवयवदानात तेलंगणने देशात बाजी मारली आहे. सरलेल्या वर्षात एकट्या तेलंगणने मेंदूपेशी मृत झालेल्या १६०जणांच्या अवयवदानाचा पल्ला गाठला. त्याखालोखाल तामिळनाडूने १४० जणांच्या तर महाराष्ट्राने १३५ जणांना अवयवदान केले. यात महाराष्ट्राने देशात तिसरे स्थान पटकावले. समाधानाची बाब म्हणजे, अवयवदानाचे हब म्हणून उदयाला आलेल्या नागपूरनेही पुणे आणि मुंबईखालोखाल राज्यात तिसरे स्थान मिळविले.
आपल्या प्रिय व्यक्तीस गमावणे ही कुठल्याही कुटुंबासाठी उद्ध्वस्त करणारी बाब असते. पण जाणारी व्यक्ती अनेकांच्या आयुष्यात नव्याने जगण्याची उर्मी देऊन जाऊ शकते, यासारख्या जीवनाच्या देणगीपेक्षा मोठे काहीच नसते. या मृतांच्या नातेवाइकांनी योग्यवेळी घेतलेल्या निर्णयातून राज्याने ही मजल मारली आहे.
अवयव निकामी झाल्याने मृत्यूच्या दारात पोहोचलेल्यांना जीवनदान मिळावे आणि अवयवदानाची चळवळ वृद्धिंगत व्हावी, यासाठी राष्ट्रीय, राज्य, विभागीय आणि प्रादेशिक पातळीवर समन्वय समित्यांची रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद अशा चार समित्या प्रादेशिक पातळीवर कार्यरत आहेत. या समित्यांनी केलेल्या समुपदेशनातून राज्यात १३५ जणांच्या महाअवयवदानाचा पल्ला गाठण्यात आला. त्यापैकी एकट्या पुणे प्रादेशिक क्षेत्रात सर्वाधिक ६३ मेंदूपेशी मृत पावलेल्यांचे अवयवदान झाले. त्याखालोखाल मुंबईने ४७ तर नागपूर प्रदेशात १८ जणांच्या महाअवयवदानाची मजल मारण्यात आली. औरंगाबाद प्रादेशिक स्तरावर मेंदूपेशी मृत पावलेल्या सातजणांचे अवयवदान झाले.
अधिक वाचा : विशेष मुलांच्या फॅशन शो ने मिळविली प्रेक्षकांची वाहवा