नागपूर : जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला निसर्गाने दृष्टीचे दान दिले आहे. त्यामुळेच प्रत्येकाला रंग आणि भवतालच्या परिस्थितीचा अंदाज बांधून शरीराला सुरक्षित ठेवता येते. मात्र, अनेक जण त्यालाच जन्मत: पारखे होतात. जन्माला येणाऱ्या दर १५ हजार बालकांमध्ये एकाला बुब्बुळात कर्करोगाच्या पेशी विकसित होतात. पूर्वी त्यामुळे दृष्टी जाण्याची जोखीम होती. आधुनिक वैद्यकशास्त्राची कास धरून ही दृष्टी वाचविता येते, असे बेंगळुरू येथील प्रख्यात नेत्रशल्यचिकित्सक डॉ. महेश षण्मुगम यांनी येथे सांगितले.
धर्मदाय तत्त्वावर सेवा देणाऱ्या बेंगळुरू येथील शंकरा आय हॉस्पिटलची जगभरात ख्याती आहे. येथे उपचारांना येणाऱ्या हजारो जणांची दृष्टी रुग्णालयाने वाचविली आहे. उपचारांना आलेल्या एकूण रुग्णांपैकी ८० हून अधिक रुग्णांकडून छदामही न घेता रुग्णालय ही सेवा प्रदान करते. तिथे रेटिनो सर्जन म्हणून डॉ. षण्मुगम सेवा देत आहेत. नागपुरात आयोजित नेत्ररोग तज्ज्ञांच्या परिषदेसाठी आले असता, साधलेल्या संवादात त्यांनी या विषयाकडे लक्ष वेधले.
लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये दोन प्रकारच्या कर्करोगाच्या पेशी विकसित होतात. त्यामुळे दृष्टी जाण्याची जोखीम बळावते, असे नमूद करीत डॉ. षण्मुगम म्हणाले, यातला पहिला कर्करोग हा डोळ्यांमधील पांढरा भाग क्षतीग्रस्त करतात, तर दुसऱ्या मेनॅलोमा प्रकारात डोळ्यांच्या आतील भाग नष्ट होतो. वैद्यकीयदृष्ट्या हा जनुकीय आजार असल्याने तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होण्याची जोखीम आहे. मात्र हा आजारच दुर्मिळ आहे. त्यातही आता अद्ययावत वैद्यकीय उपचार तंत्रामुळे लहान मुलांमधील नजीकच्या भविष्यातील हे अंधत्व टाळता येते. लहान मुलांमध्येही संगणक, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या वापराचे प्रमाण वाढल्याने लहान वयातच डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढत आहे. मात्र, सवयीवर नियंत्रण ठेवले तर ही जोखीम टाळता येते, असेही त्यांनी नमूद केले.
अधिक वाचा : ४ एप्रिलपर्यंत जन्म-मृत्यू दाखले मिळणार नाही!