नागपूर: विदर्भातील शेतक-यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्याची माहिती व्हावी त्याचा उपयोग, त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतूने, केंद्रीय रस्ते वाहतूक,महामार्ग आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन २२ नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजता रेशीमबाग मैदानावर होणार असून हे प्रदर्शन 22 ते 25 नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे. गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. नरेंद्र सिंह तोमर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. केंद्रीय मनुष्यबळ विकास, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, राज्याचे माजी अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार आणि माजी ऊर्जामंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती याप्रसंगी राहणार आहे, अशी माहिती अॅग्रो व्हिजन 2019 चे संयोजक गिरीश गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह येथे गुजरातच्या आनंदस्थित नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सहयोगाने आयोजित ‘विदर्भातील दुग्धोत्पादनाचा विकास व प्रक्रिया परिषद’ या कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री गिरिराज सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. याप्रसंगी राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप रथ, दुग्धविकास विभागाचे केंद्रीय सचिव अतुल चतुर्वेदी, कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. ए.के. मिश्रा व महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत विदर्भात डेअरी विकासाच्या संधी व आव्हाने, जनावरांच्या जाती चारा व दुग्ध पदार्थांचे प्रश्न या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन शेतक-यांना मिळणार आहे
या वर्षीच्या अकराव्या कृषी प्रदर्शन अॅग्रो व्हिजनचे मुख्य आकर्षण हे पशुधन आणि एम. एस. एम. ई. दालन व असणार आहे. एम. एस. एम. ई. व कृषी उद्योग एकमेकांना पूरक असून लघुउद्योजकांद्वारे निर्मित कृषी प्रक्रियांसाठी लागणारी अवजारे व यंत्रे याचे एम. एस. एम. ई. दालनात प्रदर्शन होणार असल्याची माहिती एम. एस. एम. ई. विकास संस्था नागपूर चे संचालक पी. एम. पार्लेवार यांनी याप्रसंगी दिली.
शेतकरी, शेती तज्ज्ञ आणि कृषी प्रेमी अशा एकूण मांदियाळीसाठी दहा हजार चौरस मीटर जागेवर प्रदर्शनाचे डोम, मोठ्या उपकरणांसाठी ४ हजार चौरस मीटरचे ओपन हँगर, उभारण्यात आले असून कार्यशाळांसाठी १२०० चौरस मीटरचे तीन हॉल्स आणि १५०० चौरस मीटरचे पशूधन दालन असा एकंदर १७ हजार चौरस मीटर परिसर प्रदर्शनाने व्याप्त आहे.
या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात दोन एकदिवसीय परिषदांसह विविध विषयांवर विस्तृत कार्यशाळा होणार आहेत. देशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि यशस्वी शेतकèयांच्या यशोगाथांपासून प्रेरणा घेण्याची संधी यातून शेतक-यांना मिळणार आहे.
24 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुरेश भट सभागृहात ‘विदर्भातील सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी’ या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून याप्रसंगी एम. एस. एम. ई. आयुक्त मोहन मिश्रा उपस्थित राहणार आहेत
शेतक-यांसाठी उपयुक्त अशा अनेक विषयांवर आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही कार्यशाळा या जास्त कालावधीसाठी असतील. यात ऊस उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, दुग्धव्यवसाय, फुलशेती, हळद व आले लागवड, संत्रा उत्पादन आणि प्रक्रीया, सेंद्रीय शेती, मत्स्यपालन (मत्स्यशेती आणि निर्यात संधी), कुक्कुटपालन, सचन यासोबतच लहान शेतक-यांना उत्पन्न वाढीची संधी असणा-या मधमाशी पालन, रेशीम शेती, हरितगृह तंत्रज्ञान व शेड नेट, कृषी वित्त पुरवठा, अॅग्री टुरिझम, सरकारी योजना, जलव्यवसथापन या आणि अशा अनेक विषयांचा समावेश आहे. करवंद लागवड आणि विक्रीच्या संधी हा नवा विषय कार्यशाळेत असणार आहे. सहा डोममधून सुमारे ३५० स्टॉल्स कृषी प्रदर्शनात राहतील. शिवाय, शेतक-यांचा उदंड प्रतिसाद मिळत असलेल्या पशूधन दालनाचेही आयोजन असून, यावर्षीही जातीवंत पशूंची संपूर्ण माहिती या प्रदर्शनात मिळणार आहे.
शेतक-यांच्या नावनोंदणीसाठी दोन काऊंटर्स तयार करण्यात आले असून, विदर्भातील दुग्ध विकास आणि प्रक्रीया उद्योग तसेच, विदर्भातील कृषी आणि अन्न प्रक्रीया उद्योगक्षेत्रात मध्यम, लघू आणि सुक्ष्म उद्योगांना संधी या विषयांवर एकदिवसीय परिषदांचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे. सोबतच, शेतक-यांसाठी बियाणे, खते, कृषीविषयक उपकरणे, आधुनिक कृषी उपकरणांची माहिती देणारे स्टॉल्स, नाबार्डसह इतर बँक्स आणि कृषीविषयक सरकारी विभागांचा अॅग्रोव्हिजनमध्ये समावेश असणार आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी, आयोजन सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर यांच्यासह अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.सी.डी.मायी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी प्रदर्शनाचा समारोप 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला असून याप्रसंगी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्यप्रताप साही, माजी खासदार विजय दर्डा उपस्थित राहणार असून या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन गडकरी राहणार आहेत. शेतकरी, उत्पादक, ग्राहक, कृषी विद्यार्थी आणि कृषीप्रेमी अशा प्रत्येकाने या कृषी प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी तसेच, कार्यशाळा आणि परिषदांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.