नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात दोन वर्षात 14 जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणी ला शोधण्यासाठी ‘टी 1 कॅप्चर मिशन’मध्ये पॅरा ग्लायडरची मदत घेतली जात आहे. सुरुवातीला हत्ती, त्यानंतर इटालियीन कुत्रे आणि आता पॅरा ग्लायडरने आकाशातून वाघिणीला शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
बुधवारी या मिशनमध्ये दिल्लीतील एका विशेष पथकासह पॅरा पॉवर मोटारिंग अर्थात पॅरा ग्लायडर आणण्यात आले आहे. सुरुवातीला खडकाळ जागेमुळे पॅरा ग्लायडर उडविताना दोन वेळा अपयश आले. मात्र तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी उडाण घेऊन संपूर्ण जंगलात जवळपास 15 मिनिटे घिरट्या घालत जंगलाची टेहळणी केली.
वाघिणीला ठार मारण्याची परवानगी मिळाल्याने सुरुवातीला प्रसिद्ध शार्प शुटर नवाब शफत अली खान याला बोलावण्यात आले. मात्र त्याच्या विरुद्ध आरोप आणि वन्यप्रेमींनी केलेल्या आंदोलनामुळे त्याला परत पाठविण्यात आले होते. मग हत्तींच्या सहाय्याने जंगलात शोध मोहीम राबविण्यात आली मात्र एक हत्ती पिसाळल्याने त्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू आणि एकजण गंभीर झाल्याने हत्तींना परत पाठविण्यात आले. मात्र त्यानंतर पुन्हा नवाब शफत अलीला पाचारण करण्यात आले व त्याच्या सल्ल्याने 9 ऑक्टोबर रोजी इटालियन केन कोर्सो जातीचे कुत्रे सुद्धा आणण्यात आले आहेत. सध्या हे कुत्रे या मिशनमध्ये सहभागी आहेत, परंतू घनदाट जंगल आणि दरी खोऱ्याचा भाग यामुळे अनेक अडचणी येत असल्यामुळे पॅरा ग्लायडर पथक बोलावण्यात आले आहे. टी 1 कॅप्चर मिशनमध्ये आम्ही यशस्वी होणार असा विश्वास पॅरा ग्लायडर पथकाने व्यक्त केला आहे.
अधिक वाचा : टी-1 या नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याच्या निर्णय विरोधात वन्यजीव प्रेमींचे आंदोलन