लंडन,
ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या अनोख्या उपकरणाच्या सहाय्याने आता फक्त पंधरा मिनिटात कोरोना बाधित रुग्णाचा शोध घेणे शक्य होणार आहे. एखाद्या खोलीत अनेक व्यक्ति जमले असतील तर त्यापैकी कोणी कोरोना बाधित असेल तर त्या खोलीतील अलार्म वाजेल आणि पंधरा मिनिटातच ही गोष्ट निदर्शनात येईल. खोलीचा आकार मोठा असेल तर मात्र ही गोष्ट समजण्यासाठी अर्धा तास लागू शकेल. आगामी कालावधीत विमानातील केबिन क्लास रूम केअर सेन्टर्स, घर आणि कार्यालयांमध्ये हे तंत्रज्ञान उपयोगी ठरणार आहे.
या उपकरणाचे नाव कोविड अलार्म असे ठेवण्यात आले आहे. आगीची सूचना देणाऱ्या स्मोक अलार्म पेक्षा हे उपकरण थोडे मोठे असणार आहे. लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि डरहम युनिवरसिटी या दोन संस्थांमधील वैज्ञानिकानी संयुक्तपणे प्रयोग करून हे संशोधन यशस्वी केले आहे. वैज्ञानिकांनी जेव्हा चाचणी केली तेव्हा त्याचे निष्कर्ष 98 ते शंभर टक्के खरे आले. आगीची सूचना देणाऱ्या स्मोक अलार्म पेक्षा हे उपकरण थोडे मोठे असणार आहेरुग्ण शोधण्यासाठी सध्या आरटिपीसीआर आणि एंटीजन या दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. पण त्यापेक्षाही ही अलार्म सिस्टीम जास्त प्रभावी असल्याचा संशोधकांनी दावा केला आहे. एखाद्या खोलीत असलेल्या अनेक व्यक्तींपैकी कोणाला कोरोनाचे संक्रमण झाले आहे, हे शोधण्यासाठी मात्र पुन्हा एकदा चाचणी करून घ्यावी लागते.
खोलीत जर जास्त लोक जमले असतील तर त्यामध्ये संक्रमित रुग्ण असेल तर आपोआप हा अलार्म वाजणार आहे त्यानंतर प्रत्येकाची व्यक्तिगत चाचणी करून शोध घेतला जाणार आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त कोरोना नव्हे तर इतर अनेक रुग्णांचा शोध घेण्यासाठी ही अलार्म सिस्टम महत्वाची ठरू शकते. डरहॅम युनिव्हर्सिटीतील बायोसायन्स प्रोफेसर लिंडसे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रत्येक रोगाचा एक स्वतंत्र असा वास असतो. त्या वासाच्या सहाय्याने रुग्णांचा शोध घेणे शक्य आहे. यासाठी हे उपकरण विकसित करण्यात आले असून त्याची किंमत फक्त पाच लाख 15 हजार रुपये आहे.