नागपूर : महानगरपालिकेला लवकरच नवीन आयुक्त मिळणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरीवर आयोजित अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते. मागील २ महिन्यांपासून नागपूर महानगरपालिकेला पूर्णवेळ आयुक्त नाही.
महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त नसल्याचा परिणाम विकासकामांवर होताना दिसतोय. तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची नियुक्ती नागपूरच्या आयुक्तपदी झाली. तर तत्कालीन महामनगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल यांची बदली नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी करण्यात आली होती.
त्यानंतर अश्विन मुदगल यांच्या जागी कडक शिस्तीचे अधिकारी अशी ओळख असलेले वीरेंद्र सिंग यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता. मात्र, सिंग यांच्या आईच्या निधनामुळे ते गेल्या २ महिन्यांपासून सुट्टीवरच आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त असलेले रवींद्र ठाकरे यांच्याकडे आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महानगरपालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा, अशी मागणी जोर धरायला लागली होती. या संदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी लवकरच नवीन आयुक्त देणार, असे स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा : जागतिक मराठी साहित्य संमेलन नागपुरात