नागपूर : आर्थिक संकटात असलेल्या नागपूर महापालिकेने नागपूर मेट्रो रेल्वेला आतापर्यंत ६६ कोटी रुपयांच्या जमीन हस्तांतरित केल्या असून पुढील दोन वर्षांत सुमारे साडेचारशे कोटींचा भूखंड हस्तांतरित करणार आहे. याशिवाय खोवा बाजार, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, नेताजी मार्केट, ऑरेंज स्ट्रीट (लंडन) विकसित करण्यासाठी ३० वर्षांकरिता भाडेपट्टीवर जमीन हस्तांतरित केली जाणार आहे.
महापालिकेचा मेट्रो प्रकल्प उभारणीत ५ टक्के वाटा आहे म्हणजे ४३४ कोटी रुपये मेट्रोला द्यायचे आहे. ही रक्कम देणे शक्य होत नाही. त्यामुळे महापालिकेने मेट्रो कॉरिडोरमधील आपल्या मालिकीच्या जमिनी मेट्रोला देऊ केल्या. आतापर्यंत मेट्रो मार्ग, स्टेशन, पॉवर स्टेशनसाठी जमिनी हस्तांतरित केल्या आहेत. मेट्रोने त्या जमिनीची किंमत बाजार मूल्यानुसार ६६ कोटी रुपये आकारले आहेत. यामुळे महापालिका आणखी काही जमिनी मेट्रोला देणार आहे, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नागपूर मेट्रो प्रकल्पाचा अंदाजित खर्च ८ हजार ६८० कोटी आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०१८ ला पूर्ण होईल, असे गृहित धरून हा अंदाजित खर्च आखण्यात आला. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढेल आणि महापालिकेचा वाटा देखील वाढणार आहे. हा खर्च ११ हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. नागपूर महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासचा प्रत्येक पाच टक्के वाटा आहे. त्यामुळे महापालिकेचा वाटा ४३४ कोटीवरून पुढे जाणार आहे.
त्यावर उपाय म्हणून महापालिकेने ज्या भागातून मेट्रो जात आहे. त्या भागातील महापालिकेचे बाजार किंवा मोडकळीस आलेल्या शाळा आणि इतर कार्यालयाची जागा महामेट्रोला देण्याचे ठरवले आहे. काही जमिनी हस्तांतरित झाल्या आहेत, तर काही प्रस्तावित आहेत, असे स्थापत्य आणि प्रकल्प समितीचे अध्यक्ष संजय बंगाले यांनी सांगितले.
अधिक वाचा : प्रत्येक नागरिकाची समस्या सोडविण्याला प्राधान्य : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे