नागपूर : पाणी ही मानवाची मुलभूत गरज आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना नियमीत व वेळेवर पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र आज संपूर्ण शहरात पाण्याचीच समस्या अग्रणी आहे. दहाही झोनमधील ‘जनसंवाद’मध्ये सुद्धा पाण्याच्या सर्वाधिक तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्याबाबतीत जबाबदारीने काम करून नियमीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
नेहरूनगर झोनमध्ये ‘जनसंवाद’ कार्यक्रमात सोमवारी (ता.१८) पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशित केले. नेहरूनगर झोनमधील दत्त मंदिर सुदामपुरी मैदानात आयोजित ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, आयुक्त अभिजीत बांगर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, दुर्बल घटक समिती सभापती हरीश दिकोंडवार, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका स्नेहल बिहारे, समिता चकोले, मनिषा कोठे, रेखा साकोरे, वंदना भुरे, मंगला गवरे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, सहायक आयुक्त हरीश राउत, पोलिस उपायुक्त निलेश भरणे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख व विविध शासकीय कार्यालय, तसेच ओसीडब्ल्यू, एसएनडीएलचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नेहरूनगर झोनमधील दोनशेच्यावर तक्रारींचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निपटारा केला. नेहरूनगर झोनमधील दर्शन कॉलनी, सुदामपुरी, भांडेप्लॉट, राजेंद्रनगर, न्यू डायमंड नगर, वाठोडा, संत गाडगेबाबा नगर, भाग्यश्री नगर, बापूनगर, ओमनगर, दत्तात्रयनगर यासह अनेक भागात नागरिकांना पाण्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गढूळ पाणी, नियमीत पाणी पुरवठा न होणे, अल्पवेळ पाणी पुरवठा, अवाजवी पाणी बिल अशा अनेक समस्यांमुळे दररोजच नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागतो. नागरिकांचा वाढता रोष पाहता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिका-यांना चांगलेच फटकारले. संपूर्ण शहरातच पाण्याच्या अनेक समस्यांचा नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. यासंबंधी नेहरूनगर झोनमध्ये प्रथम पाण्यासंबंधी अडचणी असणा-या भागामध्ये सर्व्हे करून येत्या सात दिवसांमध्ये आयुक्तांपुढे अहवाल सादर करून केलेल्या कार्यवाहीची माहिती देणे, तसेच १५ दिवसांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बैठकीत कार्यवाहीची माहिती देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. याशिवाय शहरातील संपूर्ण विहिरींची स्वच्छता करून तिथे लघुनळ योजनेद्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे असेही निर्देश त्यांनी दिले. पाण्याच्या समस्येचे गांभिर्य जपत मनपाच्या डेलिगेट्सनी ओसीडब्ल्यूच्या कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवण्याचे यावेळी आयुक्त अभिजीत बांगर यांनी निर्देशित केले.
अधिक वाचा : शहरातील दोन हजार दिव्यांगांना मिळणार ई-स्मार्ट कार्ड