नागपूर : शहरात अनेक रोजगार मेळावे होतात. नोंदणी होते. मात्र, नंतर त्याचा पाठपुरावा होत नाही. मात्र, नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे आयोजित रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण आणि प्रशिक्षणानंतर पाठपुरावा करून रोजगार उपलब्ध करून दिल्या जातो. ही गौरवास्पद बाब आहे. हा मेळावा खऱ्या अर्थाने समाजातील उपेक्षित घटकांना दिशा देणारा असल्याचे प्रतिपादन आमदार सुधाकर कोहळे यांनी केले.
नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या वतीने येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सफाई कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता आणि दिव्यांगांकरिता रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी (ता. २१) करण्यात आले होते. याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, मनपाच्या सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, हनुमाननगर झोन सभापती रूपाली ठाकूर, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, कामगार नेते राजेश हाथीबेड, वरिष्ठ विकलांग समाजसेवक नामदेवराव वलगर, स्वीकार संस्थेचे अध्यक्ष अभय दिवे, हेक्सावेअरच्या व्यवस्थापक प्रियंका चौधरी, सीपेटचे व्यवस्थापक अमोल चावके, आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या सूर्या शर्मा, अखिल भारतीय अपंग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे भास्करराव मनवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार सुधाकर कोहळे म्हणाले, येथील स्थानिकांना रोजगार मिळाला नाही तर ते शहर सोडून मोठ्या शहरात स्थलांतरित होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरात रोजगार निर्मितीसाठी मोठमोठ्या उद्योगांना येथे घेऊन येत आहेत. येथे रोजगार उपलब्ध नाहीत म्हणून रोजगाराच्या शोधात या शहरातील सव्वा तीन लाख अभियंते दुसऱ्या शहरात गेले. ही परिस्थिती आता बदलायला हवी. रोजगार मार्गदर्शनासोबतच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, जे नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून होत आहे. लाभार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार सुधाकर कोहळे यांनी केले.
महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, नागपूर महानगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी नुकतेच झोननिहाय महिला मेळावे घेऊन कौशल्य विकासासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. अशा मेळाव्यानंतर महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घ्यावे, स्वयंरोजगार सुरू करावा, यासाठीही महिला व बालकल्याण समिती कार्यरत असून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानासंदर्भात माहिती दिली. या अभियानांतर्गत एकूण ६० संस्था विविध क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षणासाठी कार्यरत आहेत. १४ सेक्टरच्या माध्यमातून ४० पेक्षा अधिक कोर्सेसचे प्रशिक्षण लाभार्थ्यांना देणे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन आनंद आंबेकर यांनी केले.
चौधरी, चावके यांचा सत्कार
दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हेक्सावेअरच्या व्यवस्थापक प्रियंका चौधरी आणि सीपेटचे व्यवस्थापक अमोल चावके यांचा आमदार सुधाकर कोहळे, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रियंका चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
लाभार्थ्यांना नियुक्तीपत्राचे वितरण
कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन रोजगार प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना यावेळी प्रशिक्षण प्रमाणपत्र व नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले. सरीता हटवार, सारिका महेशगवळी, किरण पिल्लई, शीतल ठाकरे, प्रदीप मेश्राम, कुणाल गायकवाड, शुभम पाटील, मनीष पाटील, अश्विनी झुरमुरे, पूजा भांडेकर, आकांक्षा चौधरी, नीकिता श्रीवास, रुतुजा गाडगे, पूजा माहुरकर, सुषमा ठाकरे, स्वाती डोंगरे, सविता सेलोकर, स्नेहा इंगळे यांना यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आले.
व्यवसाय संधीचे सादरीकरण
यावेळी विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधीविषयी निरनिराळ्या संस्थांनी सादरीकरण केले. आभा जेम्स ॲण्ड ज्वेलरी, व्हॅल्यू थॉट आयटी टेक्नॉलॉजी, सिग्मा इंस्टिट्यूट, आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थांनी यावेळी विविध क्षेत्रातील व्यवसाय संधीचे सादरीकरण केले. सभागृहाबाहेर विविध संस्थांचे स्टॉल्स लागले होते. या स्टॉल्सवरून लाभार्थ्यांना माहिती देण्यात आली.
अधिक वाचा : महावीर युथ क्लब तर्फे क्षमावानी समारोह व महावीर युवा गौरव पुरस्कारचे आयोजन