नागपूर : नागपूर महानगरपालिका उद्यान विभागाने सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत गुरुवारी (ता. २०) लक्ष्मीनगर झोनअंतर्गत असलेल्या विविध झाडांवरील जाहिरात फलके कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी काढली.
झाडांवर जाहिरात फलके लावणाऱ्या सुमारे ४४ जणांना मनपाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने ही मोहीम हातात घेतली आहे. पहिल्या टप्प्यात धरमपेठ झोनमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेनंतर आज गुरुवारी लक्ष्मीनगर झोनमधील झाडांवरील फलके काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला.
उद्यान विभागाचे कर्मचारी, लक्ष्मीनगर झोनचे कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी लक्ष्मीनगर झोन कार्यालय ते श्रद्धानंदपेठ, माटे चौक ते प्रतापनगर चौकादरम्यान असलेल्या झाडांवरील सुमारे ४४ फलके काढलीत. झाडांवर जाहिरात फलक लावून त्यांना इजा करणे हे महाराष्ट्र प्रोटेक्शन ॲण्ड प्रिझर्व्हेशन ऑफ ट्री ॲक्ट १९७५ अंतर्गत गुन्हा आहे. अशी फलके लावणाऱ्या ४४ लोकांना नोटीस पाठविण्यात येणार असल्याचे उद्यान विभागाचे सल्लागार सुधीर माटे यांनी सांगितले.
झाडांना खिळे ठोकल्यामुळे ज्या भागातून झाडांचे अन्न आणि पाणी प्रवाहित होते त्या भागाला इजा होते. इतकेच नव्हे तर झाड सडते. त्यामुळे झाडांवर जाहिरात फलक लावू नये, असे ते म्हणाले. शहरात ज्यांनी झाडांवर अशा प्रकारची जाहिरात फलके लावलेली आहेत त्यांनी ती तातडीने काढावीत, असे आवाहन उद्यान विभागातर्फे यावेळी करण्यात आले. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये उद्यान विभागाचे सल्लागार सुधीर माटे, नंदकिशोर शेंडे, गुणवंत पिंपळकर, संदीप सेलोकर, प्रणय गोंडोणे, लक्ष्मीनगर झोनचे चंद्रशेखर कांबळे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णुदेव यादव, राजश्री गुप्ता सहभागी झाले होते.
अधिक वाचा : मनपाच्या जागेतील अवैध दारू विक्रीसंबंधी तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत करा- धर्मपाल मेश्राम