नागपूर : गांधीबाग उद्यानासमोर कर्तव्यावर असताना नागपूर महानगरपालिकेचे ऐवजदार आनंद लिंगायत यांना खासगी ट्रॅव्हल्सने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या लिंगायत यांच्यावर उपचारासाठी मनापतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानवीय दृष्टिकोनातून आर्थिक मदतीचा हात दिला. महापौरांनीही सदर जखमी कर्मचाऱ्याची भेट घेऊन विचारपूस केली.
अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी लिंगायत यांच्या कुटुंबीयांकडे ७१ हजारांची आर्थिक मदत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने सुपूर्द केली. आनंद लिंगायत हे २ ऑक्टोबर रोजी सकाळी गांधीबाग उद्यानासमोर सफाईचे कार्य करीत होते. एका भरधाव वेगात येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतच त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायाला जबर दुखापत झाली असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहे,
त्यांच्यावरील उपचाराचा खर्च मोठा असल्याकारणाने आर्थिक मदतीची आवश्यकता होती. मनपा प्रशासनाने आवाहन करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकूण ७१ हजारांची रक्कम गोळा केली. ती त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.
महापौरांनी घेतली भेट
दरम्यान, महापौर नंदा जिचकार आणि अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी जखमी आनंद लिंगायत यांची मेडिकल रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांचे व कुटुंबीयांशी चर्चा केली. आनंद लिंगायत यांच्यावरील उपचारात कुठलीही कमतरता पडू देणार नाही. आवश्यक ती सर्व मदत मनपातर्फे करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
अधिक वाचा : नागनदीचे सौंदर्यीकरण लवकरच करणार !