नागपूर : नागपूर महानगरपालिकेने हाती घेतलेल्या शहरातील झाडांवर लागलेल्या जाहिरातींचे फलक काढण्याच्या कारवाईने चांगलाच वेग पकडला आहे. पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजीलने मनपाला या उपक्रमामध्ये मोलाची साथ देत आतापर्यंत ३६३ झाडांवरील जाहिरातींचे फलक काढले असून १८० जणांना नोटीस बजावली आहे.
सिव्हील लाईन्स येथील मनपा मुख्यालय ते विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आणि आकाशवाणी चौक ते मनपा मुख्यालय मार्गावरील परिसरात ही कारवाई करण्यात आली. उद्यान विभागातील मार्गदर्शक सुधीर माटे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. नागपूर महानगरपालिकेचा उद्यान विभाग आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने संयुक्तपणे ही मोहीम राबविण्यात येत आहे. धरमपेठ झोनपासून सुरू झालेली ही मोहिम संपूर्ण शहरात सुरू असून आतापर्यंत धरमपेठसह लक्ष्मी नगर, गांधीबाग, हनुमान नगर व आसी नगर झोनमधील झाडांवर लागलेले जाहिरात फलक काढण्यात आले व जाहिरातदारांना नोटीस बजावण्यात आली.
झाडांना खिळे ठोकल्यामुळे झाडांमधून अन्न आणि पाणी प्रवाहित होणा-या भागाला नुकसान पोहोचले जाते. पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी झाडांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे शहरवासीयांनी कर्तव्य भावनेतून झाडांना फलकमुक्त करावे, असे आवाहन ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी यावेळी केले. या मोहिमेत उद्यान विभागाचे मार्गदर्शक सुधीर माटे, प्रेमचंद तिमाने, झेड. मोहाडीकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णुदेव यादव, आदी उपस्थित होते.
धरमपेठ झोनमध्ये सर्वाधिक १७६ फलक काढले
झाडांवर आपल्या उत्पादनाच्या, संस्थेच्या जाहिरातींचे लावलेले ३६३ फलक काढण्यात आले व झाडांवर फलक ठोकून शहर विद्रुप करणाऱ्या १८० जणांना मनपाच्या उद्यान विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक १७६ फलक धरमपेठ झोनमधील काढण्यात आले असून याच झोनमध्ये ७५ जणांना नोटीस बजावण्यात आली. ११ डिसेंबरला धरमपेठ झोनमध्ये पहिली कारवाई करण्यात आली. यामध्ये ८५ फलक काढण्यात आले तर ४२ नोटीस बजावण्यात आले. यानंतर २२ डिसेंबरला झोनमधील ६४ फलक काढून २५ नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली. ३१ डिसेंबरला करण्यात आलेल्या कारवाईमध्ये २७ फलक काढून ८ जणांना नोटीस बजावण्यात आले.
याशिवाय लक्ष्मी नगर झोनमधील ९२ फलक काढून ४४ नोटीस, गांधीबाग झोनमध्ये ३१ फलक काढून १७ नोटीस, धंतोली झोनमधील २९ फलक काढून २१ नोटीस, हनुमान नगर झोनमधील २२ फलक काढून १४ नोटीस व आसीनगर झोनमधील १९ फलक काढून ९ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.
झाडांवर जाहिराती लावणे हे महाराष्ट्र प्रोटेक्शन ॲण्ड प्रिझर्व्हेशन ऑफ ट्री ॲक्ट १९७५ नुसार गुन्हा आहे. त्यामुळे मनपाने उघडलेल्या या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे. स्वत: झाडांवर जाहिरात फलक लावू नये व इतरांना परावृत्त करावे, असे आवाहन उद्यान विभागाचे मार्गदर्शक सुधीर माटे यांनी केले आहे.
अधिक वाचा : नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण