नागपूर : भारतीय सैनिकांनी पाकिस्तानावर केलेल्या हल्ल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी महापालिकेने केवळ एक तासात सर्वसाधारण सभा आटोपती घेतली.
सदस्य बाहेर आले आणि चक्क ‘झिंग झिंग झिंगाट.., प्यार लो प्यार दो’ अशा गाण्यांवर नृत्य करायला लागले. एकीकडे भारतीय सैनिकांनी प्राणाची बाजू लावून दहशतवादी तळाचा नाटनाट केला असताना महापालिकेतील सदस्यांना त्याचे गांभीर्य कसे कळले नाही, जवानांच्या शौर्याला सलाम करायचे सोडून, अशा फिल्मी गाण्यांवर नृत्य गरजेचेच होते काय, असा सवाल आता विचारला जात आहे.
महापालिकेची मंगळवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार होती. उन्हाळ्यामध्ये शहरात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असताना या विषयावर चर्चा होणे गरजेचेही होते. त्यावर अनेक सदस्यांना मते मांडायची होती. मात्र, प्रश्नोत्तराच्या तासात केवळ ६ सदस्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली आणि दीड तासात सभा आटोपती घेत जल्लोष करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभा आटोपल्यावर सर्वपक्षीय नगरसेवक सभागृहाच्या बाहेर आले आणि ढोल ताशा आणि झिंग झिंग झिंगाट, प्यार दो प्यार दो या गाण्यावर त्यांनी ठेका धरला. महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, बाल्या बोरकर, चेतना टांक, प्रगती पाटील, वंदना एंगटवार, वंदना भगत यांच्यासह बसपा आणि काँग्रेसच्या नगरसेविकाही या नृत्यात सहभागी झाल्या होत्या. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनाही मोह आवरला नाही. इकडे चित्रपटाच्या गाण्यावर ठेका धरला जात असताना बँड पथक मात्र देशभक्तीपर गाणे वाजवत होते. भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याचा जल्लोष व्हायलाच हवा, परंतु त्यासाठी गाणे कुठले निवडावे, याचेही भान महापालिका सदस्यांनी ठेवायला हवे होते, अशी प्रतिक्रिया हे नृत्य पाहणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, धंतोलीमधील भाजप कार्यालयासमोर आणि बडकस चौकात भाजपच्या सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. पाकिस्तानविरोधात घोषणा देत लोकांना पेढे वाटले.
अधिक वाचा : भारतीय हवाई दलाच्या दहशतवादी तळांवरील हल्याचे नागपुरात तरूणांकडून स्वागत