नागपूर : डिझेल पेट्रोलवर चालणारे बसेस व वाहने सी.एन.जी. द्वारे संचालित झाल्याने नागपूर शहर जल-वायू प्रदूषणापासून मुक्त असे हरीत शहर बनेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक ,महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज केले.स्थानिक म.न.पा. इमारतीसमोरील आयोजित सी.एन.जी. बस सेवेचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे उर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, म.न.पा. आयुक्त अभिजित बांगर, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, परिवहन सभापती बंटी कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर म.न.पा. च्या बाजारपेठातून निर्माण होणारी बायोवेस्ट तसेच शेतातील तु-हाटी, तणस, उसाची मळी या पासून बायो-सी.एन.जी. ची निर्मिती होते. अशा प्रकारचे प्रकल्प भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर सारख्या तांदूळ उत्पादक जिल्हयात निर्माण व्हावे व तरूण उद्योजकांनीही सी.एन.जी. उत्पादनासाठी पुढाकार घ्यावा, अशी आशा गडकरींनी यावेळी व्यक्त केली.
केंद्रीय परिवहन मंत्रालयातर्फे मुंबई, नवी मुंबई, गुवाहाटी या शहरात मिथेनॉलवर चालणा-या बसेसचा एक पथदर्शी प्रकल्प सुरू झाला आहे. गंगा ब्रम्हपुत्रामध्ये इॅथेनॉलवर संचालित इंजिनाच्या साहाय्याने जल वाहतूक होत असून यामूळे वाहतूक खर्चात घट झाली आहे. नागपूर शहरातही 100 टक्के इॅथेनॉल वर चालणा-या स्कॅनिया बस प्रकल्पाची चर्चा देशभरात होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
शेतातील तणस व शहरातील म्युनिसीपल वेस्टचे सी.एन.जी.मध्ये रूपांतर करण्यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडीया (ए.आर.ए.आय.) तर्फे प्रमाणित व पोलंडद्वारे निर्मित सी.एन.जी. किटस् या बसेसमध्ये लागणार असून यामूळे अशा ग्रीन बसचे आयुष्य 15 वर्ष राहणार आहे. इंधनाच्या बचतीने म.न.पा.ची वर्षाअखेर 75 कोटी एवढी बचतही होणार आहे. नागपूरात आजपासून चालू झालेल्या या बससेवेमध्ये 50 बसेस सी.एन.जी. वर चालविल्या जाणार आहेत. म.न.पा.च्या पदाधिकारी व अधिका-यांनी शासकीय वाहनेसुद्धा सी.एन.जी. वर चालवून एक आदर्श प्रस्तापित करावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी म.न.पा.चे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : रामन विज्ञान केंद्र शास्त्रज्ञाचे नाव असलेले भारतातील एकमेव केंद्र