बंगळूर : सणासुदीचा काळ जवळ आलेला असतानाच आता ग्राहक अमेझॉन डॉट इन वरून मराठी व बंगाली भाषांचा वापर करूनही खरेदी करू शकतात, अशी घोषणा अमेझॉन इंडियाने केली. हिंदी, इंग्रजी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलगू या पाच भाषा वापरून खरेदी करण्याची सुविधा आधीपासूनच आहे. आता हिंदी भाषेत व्हॉईस शॉपिंग सुरू करून प्रादेशिक भाषांतील ऑफरिंग अधिक विस्तारणार आहे. या नवीन उपक्रमांमुळे भाषेचा अडथळा दूर होत आहे आणि ई-कॉमर्स भारतातील लक्षावधी ग्राहकांसाठी अधिक उपलब्ध होण्याजोगे तसेच सोयीस्कर होत आहे.
अमेझॉन ग्राहक अँड्रॉईड किंवा आयओएस अॅप्स, मोबाईल तसेच डेस्कटॉप साईटस्वरून काही सुलभ पायर्यांद्वारे त्यांच्या पसंतीची भाषा निवडू शकतात. हिंदी व्हॉईस शॉपिंगचा अनुभव घेण्यासाठी ग्राहकांना अमेझॉनअॅप प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करावे लागेल. त्यानंतर त्यात हिंदी भाषा निवडावी लागेल.
अमेझॉन इंडियाच्या कस्टमर एक्सपिरियन्स व मार्केटिंग विभागाचे संचालक किशोर थोटा म्हणाले की, प्रादेशिक भाषेत खरेदीचा अनुभव देण्यामागील आमचे उद्दिष्ट ई-कॉमर्स सर्वांना उपलब्ध करणे तसेच ग्राहकांसाठी ते अधिक सुसंबद्ध व सोयीस्कर करणे हे आहे.
अमेझॉन डॉट इनचा अनुभव आमच्या मराठी व बंगाली ग्राहकांपर्यंत नेताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांचा खरेदी अनुभव अधिक रोमांचक व समाधान देणारा करण्याच्या दृष्टीने नवनवीन फीचर्स आणणे सुरूच ठेवणार आहोत.