नवीन कामगार कायद्यांतर्गत येत्या काही दिवसांत कर्मचार्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी दिली जाण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय या आठवड्यात चार नवीन कामगार कायदे लागू करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित नियमांना अंतिम रूप देऊ शकते. हे कायदे लागू करून देशाच्या कामगार क्षेत्रात सुधारित नियम आणि कायद्यांचे नवीन पर्व सुरू होणार आहे. आराखडा अंतिम झाल्यामुळे कर्मचार्यांना आठवड्यातून चार कामकाजाचे दिवस असतील आणि त्यासोबत तीन दिवस रजा मिळेल.
कामगारांच्या नोंदणी आणि कल्याणासाठी मंत्रालय इंटरनेट पोर्टल तयार
याशिवाय असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणी आणि कल्याणासाठी मंत्रालय इंटरनेट पोर्टल तयार करत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे पोर्टल जूनपर्यंत तयार होऊ शकेल. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी नोंदणी आणि इतर सुविधा या पोर्टलवर देता येतील. यामध्ये कंत्राटी कामगार, प्लॅटफॉर्म कामगार यांसारख्या कामगारांची नोंदणी केली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात अशा वेब पोर्टलच्या स्थापनेचा उल्लेख केला होता.
चार कामगार कायदे 1 एप्रिल 2021 पासून लागू होतील
कामगार सचिव अपूर्व चंद्र म्हणाले, नियम तयार केले जात असून, येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा झालीय. लवकरच हे कामगार मंत्रालय चार नवीन कायदे लागू करण्याच्या स्थितीत असेल. यामध्ये पगार/वेतन कोड, औद्योगिक संबंधांचे कोड, कामाशी संबंधित सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी अटी (ओएसएच) आणि सामाजिक सुरक्षा असा कायद्यांचा समावेश असेल. कामगार मंत्रालय एप्रिलपासून चार कायद्यांची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.
4 कोडमध्ये 44 प्रकारचे जुने कोड
कामगार कायदे सुधारण्यासाठी मंत्रालयाने एकूण 44 प्रकारचे जुने कामगार कायदे चार कायद्यांमध्ये एकत्रित केले आहेत आणि अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. कामगार मंत्रालयाला हे कायदे एकाच वेळी राबवायचे आहेत.
सरकार पोर्टल तयार करतंय
पोर्टलबाबत चंद्र यांनी सांगितले की, पोर्टल तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असून, ते जूनपर्यंत सुरू करता येईल. या पोर्टलवर अल्प मुदतीवरील कंत्राटे किंवा कामावर आधारित कामगार, बांधकाम कामगार व इतर राज्यांतून मजुरीसाठी येणार्या कामगारांची माहिती संकलित केली जाईल. यावर अशा मजुरांच्या नोंदणीची सुविधा असेल. त्यांना एक वर्षासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत मोफत विमा संरक्षण देण्यात येईल. कामगार ब्युरो चार नवीन सर्वेक्षण करणार असून, कामगार, घरगुती कामगार, व्यावसायिक आणि इतर राज्यांतून येणाऱ्या परिवहन क्षेत्राद्वारे मिळणार्या रोजगाराशी संबंधित, असेही चंद्र यांनी सांगितले. ब्यूरो आस्थापनांवर आधारित अखिल भारतीय रोजगार सर्वेक्षण सुरू करेल.