वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (नीट) विश्वासार्हतेबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (पीसीएम) विषयांमध्ये ‘शून्य’ गुण मिळवलेल्या ११० विद्यार्थ्यांनाही खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळाल्याचे उघड झाले आहे.
इतकेच नव्हे तर पीसीएममध्ये एक आकडी गुण मिळवलेले ४०० विद्यार्थीही खासगी महाविद्यालयात एमबीबीएसला दाखल आहेत. हे प्रवेश पैशांच्या जोरावर झाल्याचे सांगितले जाते.
२०१७ मध्ये ‘नीट’ परीक्षेत ७२० पैकी १५० गुण मिळवलेल्या देशभरातील १९९० विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. त्यातील ५३० विद्यार्थी हे फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयात १० पेक्षा कमी गुण किंवा अगदी शून्य गूण मिळालेले आहेत. ५३० पैकी ५०७ विद्यार्थ्यांना खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे असे वृत्त एका इंग्रजी नियतकालिकाने दिले आहे. ‘नीट’ परीक्षेसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (पीसीएम) या विषयांसाठी स्वतंत्र कट-ऑफ ठेवण्यात आलेला नाही.
प्रत्येक पेपरमध्ये किमान किती गुण असावेत याचाही उल्लेख नाही. जे विद्यार्थी वार्षिक किमान १७ लाख रुपये शुल्क भरू शकतात असे विद्यार्थी मोजके गुण मिळवूनही खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवू शकले आहेत. या वृत्तामध्ये एक उदाहरणही देण्यात आले आहे. एका विद्यार्थ्यांला फिजिक्समध्ये २, केमिस्ट्रीमध्ये ४ आणि बायोलॉजी विषयात १३९ गुण मिळाले. तरीसुध्दा त्याला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. गेल्यावर्षी ६.१ लाख विद्यार्थी ‘नीट’ परीक्षेत उत्तीर्ण झाले.
एमसीआयच्या सुधारित अधिसूचनेने घातला घोळ
पीसीएममध्ये ५० टक्के गुण असलेला विद्यार्थीच वैद्यकीय किंवा दंत अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी पात्र ठरू शकतो असा निकष होता. परंतु नगण्य गुण मिळवूनही शेकडो विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळाला यामागचे कारण मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) काढलेली सुधारीत अधिसूचना आहे. त्यात पीसीएममध्ये किमान ५० टक्के गुण अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे. या अधिसूचनेत एमसीआयने तातडीने बदल केला पाहिजे असा सल्ला शिक्षणतज्ञांनी दिला आहे.
अधिक वाचा : मराठी माध्यमातील भुगोलाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे