नागपूर : कामठीतील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा १९ वा वर्धापन दिन कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर गुरुवारी २३ नोव्हेंबरला आयोजीत करण्यात आला आहे. यानिमित्त जपान येथील विविध बौद्ध विहारांतील प्रमुख भंतेंच्या उपस्थितीत बुद्धवंदना व धम्मदेसनेचा कार्यक्रम होणार आहे.
जपान येथील आंतरराष्ट्रीय निचिरेन-शु बुद्धिस्ट फेलोशिपचे अध्यक्ष भदंत कानसेन मोचिदा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले तसेच राम विलास पासवान देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ड्रॅगन पॅलेसच्या संचालीका आणि माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ड्रॅगन पॅलेस टेम्पलला आतापर्यंत १ कोटी लोकांनी भेट दिली असून अडीच वर्षांत या टेम्पलचे बांधकाम पूर्ण झाले आहे. केंद्रशासनातर्फे नागपूर पॅलेस कमिटी अंतर्गत ड्रॅगन पॅलेसचा बुद्धीस्ट सर्किटमध्ये समावेश करण्यात आला आहे. या सर्किटमध्ये देशातील ३५ वास्तू शिल्पांचा समावेश आहे. बिहारमधील बुद्धगया, महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ आणि विदर्भातील दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसचा समावेश करण्यात आला आहे.
अधिक वाचा : अपूर्व विज्ञान मेळावा २८ नोव्हेंबरपासून