मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मुंबईच्या उपनगरी भागातील ग्राहकांना ड्रग्ज पुरवणाऱ्या विद्यार्थ्याला एनसीबीने अटक केली. विद्यार्थ्याला बेड्या ठोकण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घाबरवण्यासाठी बिलंदर आरोपीने त्यांच्यावर कुत्रे सोडले.
एनसीबीने कॉलेज विद्यार्थ्याला ड्रग्ज पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केली. मुंबईच्या वांद्रे भागात त्याच्या घरी छापा टाकून कारवाई केली. हा विद्यार्थी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मुंबईच्या उपनगरी भागात राहणाऱ्या लोकांना ड्रग्ज पुरवठा करत होता. लॉकडाऊनच्या काळात आरोपीने ड्रग्ज विकण्याला सुरुवात केली होती.
विभागीय संचालकांच्या पथकावर कुत्रे सोडले दरम्यान, आरोपीला अटक करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा अधिकाऱ्यांना घाबरवण्यासाठी आणि कारवाई रोखण्यासाठी आरोपीने नसता आगाऊपणा दाखवला. विभागीय संचालक यांच्या पथकावर कुत्रे सोडले. तरीही न घाबरता एनसीबीने कारवाई करत आरोपीला अटक केली.
गोव्यातून सुशांतला ड्रग्ज पुरवणारा पेडलर अटकेत बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुशांतला ड्रग्ज पुरवणाऱ्या पेडलरला एनसीबीने मार्च महिन्याच्या सुरुवातीला अटक केली होती. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या माहितीनुसार गोव्यातून मादक पदार्थांची खरेदी करणार्या तिघा जणांना अटक केली होती, त्यापैकी एक जण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्स पुरवठा करत होता.
यापूर्वी एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी सांगितले होते की, त्यांच्या अनेक अधिकाऱ्यांनी गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकला असून, तेथून बरेच ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले आहेत. वृत्तानुसार, पेडलर्स आणि ड्रग्ज दोन्हीही ताब्यात घेण्यात आले.
एनसीबीने दाखल केले आरोपपत्र
बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबीने कोर्टात 12,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कोर्टाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, एनसीबीने हे आरोपपत्र 33 लोकांविरोधात दाखल केले आहे. हे सर्व लोक सुशांतला ड्रग्ज पुरवठा आणि खरेदी, तसेच इलिसिट फायनान्सशी थेट जोडलेले आहेत.
या संपूर्ण यादीमध्ये रिया चक्रवर्ती , तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, ड्रग पेडलर्स करमजित, आझम, अनुज केसवानी, डुआने फर्नांडिस आणि अर्जुन रामपालच्या मैत्रिणीचा भाऊ यांची नावे देखील आहेत. अर्जुन रामपालच्या मैत्रिणीच्या भावाच्या घरीही चरस सापडला होता. या चार्जशीटमध्ये त्याचे नावही आहे. रिया आणि शौविक यांच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 ए आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. याचा अर्थ असा की, त्यांच्याकडून औषध खरेदी, इलिसिट फायनान्स आणि ट्राफिकिंग केले जात होते.