नागपूर: इंडियन मेडिकल असोसिएशनचा शैक्षणिक भाग असलेल्या अकादमी ऑफ मेडिकल स्पेशालिस्ट संघटनेतर्फे १७ व्या वार्षिक परिषदेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत मधुमेह व्यवस्थापनापासून ते कर्करोगासारख्या दुर्धर व्याधींवरील उपचारांपर्यंत तज्ज्ञांना अद्ययावत उपचारतंत्राची आणि वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेल्या स्थित्यंतराची माहिती दिली जाणार आहे.
या निमित्त आयएमएच्या नागपूर शाखेचीही वार्षिक परिषद घेतली जाणार आहे. शनिवारी २१ सप्टेंबरला परिषदेचे औपचारिक उद्घाटन होईल. या वेळी आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार डॉ. शंतनू सेन उपस्थित राहतील. महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. होजी कपाडिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये वैद्यकीय शास्त्राशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करतील. या प्रसंगी व्ही.एन. वानकर जीवनगौरव पुरस्कार डॉ. सेन यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. पहिल्या दिवशी मधुमेह आणि थायरॉइड रोगाच्या व्यवस्थापनासंबंधीतील गैरसमज या विषयावर सत्र होईल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी औपचारिक उद्घाटन करण्यात होईल. सकाळी ११ वाजता वैज्ञानिक सत्रांना सुरुवात होईल. शंभर वर्षे कसे जगावे, या विषयावर या निमित्त परिसंवाद होणार आहे. महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. वाय.एस. देशपांडे, आयएमएच्या नॅशनल प्रोफेशनल प्रोटेक्शन स्किमचे अध्यक्ष डॉ. कृष्णा पराते, आयएमए-एएमएसचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, आयएमए-एएमएसचे सचिव डॉ. राजीव अग्रवाल, माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र आयएमएचे संरक्षक डॉ. अशोक अढाव, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पचनेकर, नागपूरचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजुषा गिरी प्रामुख्याने उपस्थित राहतील.