नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवासारख्या आयोजनातून नागपुरात खेळाविषयी पोषक वातावरण तयार झाले आहे. नागपूर महानगरपालिकेची क्रीडा समिती आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विविध खेळांना प्रोत्साहन देत आहे. धनुर्विद्या हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे. नागपुरात या खेळाची राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा आयोजित करणे, ही अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारे स्पर्धक तयार होतील, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र धनुर्विद्या असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
मंचावर आमदार प्रा. अनिल सोले, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त रवींद्र ठाकरे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अर्जुन पुरस्कार विजेते अभिषेक वर्मा, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पुर्णिमा महातो, भारतीय तिरंदाजी संघटनेचे कोषाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर, नगरसेवक भगवान मेंढे, राजेंद्र सोनकुसरे, प्रदीप आगलावे, राजेश घोडपागे, नगरसेविका दिव्या धुरडे, स्नेहल बिहारे, सरला नायक, नागपूर धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष मुकुल मुळे, सचिव संजय कहुरके, क्रीडा अधिकारी नरेश सवाईतुल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी उपस्थित होते.
महापौर नंदा जिचकार पुढे बोलताना म्हणाल्या, गेल्या दीड वर्षात महापौर चषकांतर्गत नागपुरात विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे महिलांसाठी राज्यस्तरावर स्पर्धांचे आयोजन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. कधी नव्हे इतक्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. टिव्ही, मोबाईल, इंटरनेटच्या युगात मैदानी खेळांना अशा स्पर्धांमुळे सुगीचे दिवस आले. अशा स्पर्धांमुळे खेळभावना वाढीस लागते आणि विद्यार्थ्यांचा मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. यापुढेही अशाच स्पर्धांना नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रोत्साहन देण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी स्पर्धेचे विधीवत उद्घाटन केले. नागपुरात आयोजित ही स्पर्धा कदाचित सर्वात मोठे आयोजन असावे, असा गौरवोल्लेख द्रोणाचार्य अवॉर्ड विजेत्या पुर्णिमा महतो यांनी केला. प्रास्ताविकातून महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांनी आयोजनामागील भूमिका विषद केली. नागपूर महानगरपालिकेच्या पुढाकाराने नागपुरात इतके मोठे आयोजन शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेदरम्यान पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि धनुर्विद्या प्रशिक्षणाचे
स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. सुमारे १०८ स्पर्धक एकाच वेळी तिरंदाजी करू शकेल, अशी व्यवस्था मैदानात करण्यात आले असल्याचे क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी सांगितले. संचालन आणि आभार प्रदर्शन नागपूर धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष मुकुल मुळे यांनी केले.
१३ नोव्हेंबरला समारोप
नागपुरात आयोजित धनुर्विद्या स्पर्धेत देशभरातील सुमारे १३०० स्पर्धक सहभागी झालेले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन ११ नोव्हेंबर रोजी झाले. समारोप १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
अधिक वाचा : हिंगणा मार्गाच्या मेट्रो खांबावर साकारले व्हर्टिकल गार्डन