नवी दिल्ली : कोरोना महामारीला रोखण्यासाठी भारतात ३ मे पर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १४) याची घोषणा केली. पंतप्रधांनी आज देशाला संबोधीत केले. यावेळी ते बोलत होते.
पीएम मोदी म्हणाले की, सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊनचा मोठा लाभ देशाला मिळाल आहे. भारताने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. जर हे निर्णय योग्यवेळी घेतले नसते तर काय झाले असते याच्या कल्पनेनेच अंगावर काटे उभे राहतात. अन्य देशांशी भारताची तुलना करणे योग्य नाही, तरी देखील तुलनेने भारतातील करोनाबाधितांची संख्या ३० टक्क्यांनी कमी आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आपण संयम ठेवू, नियमांचे पालन करू आणि कोरोनासारख्या साथीला आम्ही पराभूत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच देशवासीयांनी कोरोनावर मात करण्यासाठी सप्तपदीचे पालन करण्याचे आवाहन यावेली मोदींनी केले.
काय आहेत सप्तपदी सूत्रे…
पहिली गोष्ट :
आपल्या घरातील वडीलधा-यांची विशेष काळजी घ्या. विशेषत: ज्यांना जुने आजार आहेत, आपल्याला त्यांच्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल. वडीलधा-यांना कोरोनापासून खूप सुरक्षित ठेवावे.
दुसरी गोष्ट :
लॉकडाउन आणि सामाजिक अंतराच्या लक्ष्मण रेषेचे पूर्णपणे पालन करा. मास्कचा काटेकोरपणे वापर करा.
तिसरी गोष्ट :
आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. गरम पाणी प्या.
चौथी गोष्ट :
कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य सेतु मोबाइल अॅप डाउनलोड करा. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी इतरांना प्रेरित करा.
पाचवी गोष्ट :
शक्य होईल तितक्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या. त्यांच्या अन्न-धान्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहा.
सहावी गोष्ट :
आपल्याबरोबर आपल्या व्यवसायात, आपल्या उद्योगात काम करणा-या लोकांप्रती संवेदनशील रहा. कुणालाही नोकरीवरून काढू नका.
सातवी गोष्ट :
देशाचे कोरोना योद्धे, जसे की, डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस कर्मचा-यांचा पूर्ण आदर राखा.
पीएम पुढे म्हणाले की, भारतात कोरोनाची समस्या दिसता क्षणी आपण त्यावर उपाय करणे सुरू केले. भारतीय नागरिकांनी दाखवलेला संयम प्रेरणादायी आहे. देशव्यापी लॉकडाउनच्या काळात लोकांनी संयम पाळल्याचे दिसले. यासाठी मी देशवासीयांचे आभार मानतो.
पंतप्रधानांनी देशातील विविध राज्यांमधील सण आणि नववर्षानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतिनिमित्त श्रद्धांजली वाहिली. जयंतीदिनी मी डॉ. बाबासाहेब आंबोडकरांना नमन करतो, असे ते म्हणाले.
Also Read- आयसोलेशनसाठी जामा मशिद देण्याची तयारी