केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या यशवंत स्टेडीयमस्थित संयुक्त प्रादेशिक केंद्र-सी.आर.सी. (दिव्यांगजन) यांच्या मानसशास्त्र विभागाद्वारे दिव्यांग युवकांसाठी ‘युवा टॅलेंट फेस्टिव्हलचे’ आयोजन दिनांक १० मार्च, २०२१ रोजी आभासी पद्धतीने करण्यात येत आहे.
दिव्यांग युवकांचा सर्वागिण विकास होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक बाबींसह त्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी, त्यांच्यातील न्युनगंड काढुन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून त्यांच्या कलेचे सादरीकरण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी ‘युवा टॅलेंट फेस्टिव्हल’ सांस्कृतिक स्पर्धा महत्वाच्या ठरतात.
दिव्यांग व्यक्ती-मधील कला आणि संस्कृतीचा अर्थ ओळखणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे, जो त्यांच्यासाठी एक नवा शिकण्याचा अनुभव असेल. त्यामुळे सी.आर.सी.-नागपूरद्वारा कर्ण-बधिर युवक व बौद्धिक दिव्यांग युवकांसाठी नृत्य स्पर्धा, अंध तथा दृष्टिबाधित प्रवर्गातील दिव्यांग युवकांसाठी गायन स्पर्धा तसेच कर्ण-बधिर युवक व बौद्धिक दिव्यांग, आटिज्मग्रस्त युवकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन या युवा टॅलेंट फेस्टिव्हल अंतर्गत करण्यात येत आहे.स्पर्धेत प्रथम, द्वितीय तथा तृतीय स्थान पटकविणा-या सर्व दिव्यांग स्पर्धकास रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल आणि सर्व सहभागी दिव्यांग युवकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येतील, अशी माहिती सी.आर.सी. च्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख अपर्णा भालेराव-पिंपळकर यांनी दिली आहे.
युवा टॅलेंट फेस्टिव्हल अंतर्गत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणताही नोंदणी शुल्क नाही. वय वर्ष १८ ते ३५ वर्षे वयोगटातील सर्व दिव्यांग युवकांना तथा त्यांच्या पालकांना आव्हान करण्यात येते की, आपल्या कलेचा प्रकार गायन, नृत्य, चित्रकला यापैकी कोणतेही एक २ मिनिटांचा व्हिडीओ करून आपले संपुर्ण नाव शाळा , महाविद्यालय ,संपुर्ण पत्ता , वयोगट , गाव , शहराचे नावानिशी उत्तम स्थितीत [email protected] या ईमेलवर पाठवावा आणि या युवा टॅलेंट फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हावे, असे आव्हान सी.आर.सी. नागपुरचे संचालक प्रफुल्ल शिंदे, यांनी केले आहे.