नागपूर : घटस्फोटित पुरुषांसोबत लग्न करून त्यांची फसवणूक करणाऱ्या शिक्षिकेची ठगबाजी सुरू असून, या शिक्षिकेने आणखी एकाला तोतया पोलिसांच्या मदतीने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी शिक्षिकेसह तिच्या साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
समराला सीमा मुक्तार अहमद अन्सारी ऊर्फ समीरा फातिमा मो. तारीक अनिस, रेहला जमाल मुक्तार अहमद अन्सारी, आतिल अन्सारी, नवीन महाजन, बाबाभाई व डॉ. उज्ज्वला कलंत्री अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुद्दसर मोमीन यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. समराला ऊर्फ समीराविरुद्ध यापूर्वीही मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. समराला अन्सारी मोमिनपुऱ्यातील इस्लामिया हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये समरालाचे भिवंडी येथील इमरान अन्सारीसोबत लग्न झाले होते. सतत वाद होत असल्याने तिने इमरानपासून घटस्फोट घेतला. १६ एप्रिल २०१३ मध्ये तिने यशोधरानगर येथील नजमून शाकीब यांच्याशी लग्न केले. काही दिवसांनी त्यांच्यापासूनही ‘फारकत’ घेतली. यानंतर ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर तिची ओळख मूळ औरंगाबाद येथील मुदस्सर मोमीन (वय ३८) यांच्यासोबत झाली. ते टीव्ही दुरुस्तीची कामे करतात. तिने मुद्दसर यांना नागपुरात बोलाविले. मुद्दसर यांनी सुगतनगरमध्ये भाड्याने घर घेतले. समराला व रेहला जमाल मुख्तार अहमद अन्सारी (रा. येरखेडा) या दोघींनी मुद्दसर यांना समरालाचे दुसरेच लग्न असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. प्रत्यक्षात तिचे हे पाचवे लग्न होते.
मुद्दसर यांच्यासोबत लग्नाची बोलणी झाली. समरालाने त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. त्यानंतर समराला ही मुद्दसर यांच्यासोबत वाद घालायला लागली. २३ एप्रिलला समराला ही मुद्दस्सर यांना आर. एस. हॉटेल घेऊन गेली. तेथे त्यांना बळजबरीने दारू पाजली. त्यांचे अश्लील छायाचित्र व व्हिडीओ काढले. याद्वारे तिने साथीदारांच्या मदतीने अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. साथीदार पोलिस असल्याची बतावणी करून तिने पुन्हा मुद्दस्सर यांच्याकडून पैसे उकळले. समराला ही फसवणूक करीत असल्याचे कळताच मुद्दस्सर यांनी जरीपटका पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
गर्भपाताचे बनावट प्रमाणपत्र, शाळेचीही फसवणूक
गर्भपात झाल्याचे बनावट प्रमाणत्र सादर करून समरालाने शाळेचीही फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिने कामठीतील डॉ. उज्ज्वला कलंत्री यांच्याकडून गर्भपात झाल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यामुळे कलंत्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याशिवाय, तिने गणेश ऊर्फ गणपत याच्या मदतीने मेयोचे डॉ. खोब्रागडे यांच्या नावानेही प्रमाणपत्र तयार करुन घेतले. पोलिसांनी माहिती काढली असता डॉ. खोब्रागडे यांचे सात वर्षांपूर्वीच निधन झाल्याचे समोर आले. या प्रमाणपत्राच्या आधारे समरालाने पगारी रजा व वेतन घेऊन शाळेचीही फसवणूक केली.
अधिक वाचा : नागपूर – विदर्भवादी करणार वीजबिलाची होळी