नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत होम स्वीट होम, प्रोजेक्ट टेन्डरशुअर, अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि स्मार्ट ॲन्ड सेफ सिटी प्रकल्पाच्या श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. पूर्व नागपुरातील भरतवाडा टी-पॉइंट येथे पार पडलेल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी होते.
व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार डॉ. मिलिंद माने, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, उपनेते बाल्या बोरकर, नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सभापती प्रवीण परदेसी, मनपा आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे व इतर मनपा पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकल्पामुळे येथील नागरिकांच्या घरांच्या किमती पाचपट वाढतील. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचीही आज समजूत काढण्यात आली आहे. शहरात एक हजार किमीचे फायबर ऑप्टिकचे जाळे तयार करण्यात आल्याने वाहतूक, पार्किंग स्मार्ट होईलच, शिवाय मनपाच्या ई-सेवाही नागरिकांना सहज मिळतील. राज्य सरकारने अर्बन महानेट प्रकल्प सुरू केला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रकल्पामुळे मनपा, सरकारी कार्यालये, जि. प. शाळा, कॉलेज ब्रॉडबॅंडने जोडली जाईल. डाटा जमा करण्याची मोठी स्पेस याद्वारे मिळणार असून वर्षाला केवळ १ रुपया आकारला जाईल. यामुळे शाळा, महाविद्यालये, कार्यालये स्मार्ट होतील, भ्रष्टाचार थांबेल.
म्हटले ते करून दाखविले – गडकरी
निवडणुकीपूर्वी नागरिकांना जे वचन दिले, ते पूर्ण केले. जे म्हटले ते करून दाखविले, असे नमूद करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरू असलेल्या प्रकल्पामुळे शहराचे चित्र बदलत असल्याचे सागितले. स्मार्ट सिटी प्रकल्पातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा नागरिकांना मिळतील. ५० हजार रोजगार देण्याचा संकल्प केला होता. त्यापैकी २२ हजार युवकांना रोजगार दिला असून वर्षभरात २५ हजार तरुणांना रोजगार मिळेल, असेही गडकरी म्हणाले.
‘कुणाचेही नुकसान होऊ देणार नाही’
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी कुणाचेही नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपापल्या भाषणातून दिली. घर दिल्याशिवाय जागा घेणार नाही. शेतजमिनीसाठीही योग्य मोबदला देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. लोकांचा रोजगार, घर हिरावून कुठलाही प्रकल्प केला जाणार नाही. जागेऐवजी जागा, घराऐवजी घर मिळेल, असे गडकरी म्हणाले.
आयडिया चॅलेंज कॉन्टेस्टचे बक्षीस वितरण
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नवनवीन संकल्पना मागविण्यासाठी घेण्यात आलेल्या ‘आयडिया चॅलेंज कॉन्टेस्ट’मधील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. गौरव चौकसे, मंदार तुलनकर, अनुराग कुमार, ऋषभ चौरसिया, प्रफुल्ल घारपुरे, मनीष गोडे, अमेय देशमुख, सुभाष भावे यांना सन्मानित करण्यात आले.
अधिक वाचा : Budget 2019 : नागपूर- छिंदवाडा ब्रॉडगेजसाठी १२५ कोटी