मूळ नागपूरचे मात्र सध्या पुण्यात टाटा मोटर्सच्या अभियांत्रिकी संशोधन केंद्रात उपमहाव्यवस्थापक पदावर कार्यरत उदयन पाठक यांना जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेचा एफएएसएम (फेलो अमेरिकन सोसायटी ऑफ मटेरिअल्स) पुरस्कार जाहीर झाला आहे. एफएएसएमतर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार धातूशास्त्रातील विशेष योगदानाबद्दल देण्यात येतो.
वाहन उद्योगाला लागणाऱ्या निरनिराळ्या पारंपरिक मिश्र धातूऐवजी निकेल, मॉलिब्डेनम, क्रोमियम इत्यादी मिश्रणांचे प्रमाण कमी असलेल्या मिश्र धातूंचा वापर, तसेच ऊर्जा वाचवणाऱ्या आणि नसíगक संसाधनांचा कमीत कमी वापर करून या मिश्र धातूंवरील अनेक शाश्वत प्रक्रियांवर भारतात संशोधन करून त्या संस्थापित करण्यासाठी पाठक यांचे मोलाचे योगदान आहे. पाठक हे विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तांत्रिक संस्थेच्या १९८६ च्या तुकडीचे विद्यार्थी तसेच शासकीय तंत्रनिकेतन तसेच धरमपेठ विज्ञान महाविद्यालय आणि सीपी अॅण्ड बेरार शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांचे ते लहान बंधू असून स्व. बाबुराव आणि निशाताई पाठक यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. त्यांना हा पुरस्कार मंगळवारी १६ ऑक्टोबर रोजी अमेरिकेतील ओहायो प्रांतात कोलंबसमध्ये एका विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. पाठक यांनी टाटा मोटर्सपूर्वी जॉन डियर, डीजीपी हीनोदय, स्पायर इंडिया, भारत फोर्ज इत्यादी कंपन्यांमध्ये विविध पदांवर कार्य केले आहे. एएसएम इंटरनॅशनल पुणे शाखेचे ते माजी सचिवही राहिलेले आहेत.
अधिक वाचा : राम मंदिर उभारणीतील खरा अडथळा मोदी प्रवीण तोगडियांचा हल्लाबोल