नागपूर : मध्य आणि दक्षिण नागपूरला जोडणारा आणि जुन्या नागपूरचे वैभव अशी ओळख असलेला प्रसिद्ध केळीबाग मार्ग रस्ता रुंदीकरणात त्याची ओळखच हरवून बसणार आहे. या मार्गावरून विविध उत्सवाच्या निघणाऱ्या मिरवणुका, त्या बघण्यासाठी परिसरातील दुकानात होणारी लोकांची गर्दी, जुनी मंदिरे आणि तेथील उत्साह आजही लोकांच्या हृदयात घर करून बसले आहे.
मात्र, आता रस्ता रुंदीकरणाऱ्यांच्या नावाखाली केळीबागचे हे वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या केळीबाग मार्गावरील दुकानावर आणि तेथील ऐतिहासिक धार्मिक स्थळावर बुधवारपासून बुलडोजर चालवला जाणार आहे.
जुन्या नागपूर शहराचा मध्यवर्ती भाग आणि जुनी बाजारपेठ म्हणून लौकिक असलेल्या केळीबाग मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. हा जुना रस्ता ८० फुटांचा होणार आहे. त्याला लागून बुधवार बाजार असून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. भोसलेच्या काळात या जागेवर घोडय़ांचा तबेला होता. जुन्या नागपुरात राहणाऱ्यांना बुधवारी बाजाराचे वैभव आजही आठवते. टिळक रोड व वॉकर रोड यांना जोडणारा हा मार्ग नागपुरातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात शुक्रवार दरवाजावरून इंग्रजांनी केलेला गोळीबार या मार्गाने अनुभवला आहे.
१९३२ साली नागपुरात प्रथमच झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आठवणीही जुळल्या आहेत. सी.पी.अॅन्ड बेरार, श्रीमती बिंझाणी महाविद्यालय, नीलसीटी यासारख्या नामवंत शिक्षण संस्था, रसिकाग्रणी श्रीमंत बाबुराव देशमुखांच्या वाडय़ावर झालेल्या बालगंधर्वापासूनच्या सर्व मैफिलींमधील सूर ऐकून हा मार्ग तृप्त झाला होता. कल्याणेश्वराच्या मंदिरातील काकड आरतीने जागा होणारा केळीबाग मार्ग आपल्या पोटात अनेक रहस्ये दडवून बसला आहे. ऐतिहासिक मारबतीसह गणेशोत्सव तसेच मोहरमच्या दिवशी निघणारी मिरवणूक या मार्गाने अनुभवली आहे.
या मार्गावर बडकस चौकातील संतोषी माता मंदिर, महालक्ष्मी मंदिर, शिरपूरकरांचे राम मंदिर, जैन मंदिर, कालभैरव मंदिर आणि अनेक विवाह समारंभ अनुभवलेले ज्योती मंगल कार्यालयातील मुरलीधर मंदिर इत्यादी धार्मिक स्थळे या मार्गावर आहेत. राजाभाऊ बढेंसारख्या कविश्रेष्ठाचे वास्तव्य याच मार्गाच्या कुशीत होते. नागपूर-विदर्भातील एकाही लग्नसमारंभात ज्यांच्याशिवाय ‘पान’ हलत नसे,ज्यांच्या हाताची चव आजही जुन्या पिढीतील लोक विसरू शकत नाहीत, ती तेलंगी आचारी ही संस्था याच मार्गाच्या आश्रयाने रूजली, वाढली, लोकप्रिय झाली. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली उद्या या मार्गावर बुलडोजर चालण्याच्या पूर्वी दुकानदारांनी स्वत:हून दुकाने तोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एक एक करीत दुकानाचा भाग पाडला जात आहे.
अधिक वाचा : त्रिपुरा के मुख्यमंत्री ने की संघ प्रमुख से मुलाक़ात : दीक्षाभूमि के दर्शन किये