नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रूग्णांकरीता आणि संशयितांकरीता आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. मात्र, रुग्णांची वाढती संख्या बघता भविष्यात आयसोलेशन वॉर्डासाठी जागा कमी पडू शकते. हा विचार करून गरज भासल्यास जामा मशिदीचा वापर आयसोलेशन वॉर्ड म्हणून करा, ‘असे मशिदीच्या कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर, जामा मशिदीच्या तळघराचा भाग आयसोलेशन वॉर्डात रुपांतरित केला जाऊ शकतो. ही जागा सुमारे ५ हजार वर्ग फूट इतकी आहे. याखेरीज जागा अपुरी पडत असल्यास मोमिनपुऱ्यातील मशिदी आणि मदरस्यांमधील खोल्यासुद्धा उपलब्ध केल्या जाऊ शकतात असेही कमिटीच्या सदस्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर पडू नका : जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे
नागपूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. प्रशासनाने वारंवार आवाहन करुनसुद्धा नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. ही बाब गंभीर असून विनाकारण घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित राहा, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.
मुस्लिम समाजबांधवांनी नमाज पठन घरातच करावे, असे आवाहन मौलवींनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मुस्लिम समाजातील प्रमुख मान्यवरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अब्दुल बारी पटेल, अमन फाऊंडेशनचे झाकीर खान, मौला हाफीज मसूद अहमद व हाफीज अब्दुल वाशिद यावेळी उपस्थित होते. मुस्लिम समाज बांधवांनी घरातच नमाज पठन करावे, असे कळकळीचे आवाहन मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी समाज बांधवांना केले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, नागपूर शहरातील नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे वागणे गरजेचे असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे कळकळीचे आवाहन त्यांनी जनतेला केले.
Also Read- नागपुरात मध्य भारतातला करोनाचा उच्चांकी आकडा