नागपुर : ड्रग्स तस्करांवर वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई ; तब्बल १३ लाखांचे एमडी जप्त

नागपुर : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुख्यात एमडी तस्कर आमिर खान आतिक खान याने मुंबईतून २५६ ग्रॅम एमडी तस्करी करून नागपुरात आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते ड्रग्स नागपुरातील कुख्यात तस्कर मोहम्मद अमिर मुकीम मलिक (हमिदनगर) याला देणार होता.

मो. अमीर याने पंटर सोनू ऊर्फ फुलसिंग सोहनसिंग पठ्ठी (३०, पिली नदी) याला ड्रग्सचे पाकीट दिले होते. ते पाकीट तो गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बैद्यनाथ चौकात डीलिंगसाठी आणणार होता. याची खबर एनडीपीएसचे निरीक्षक सार्थक नेहते यांना मिळाली. त्यांनी गुरुवारी दुपारी बैद्यनाथ चौकात सापळा रचला. त्यात सोनू पठ्ठी पकडल्या गेला. सोनूकडून १० लाखांची एमडी जप्त करण्यात आली.

त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने साथीदारांची नावे सांगितली. प्रशांत विश्‍वराम सुटे (रामबाग, इमामवाडा), मोहम्मद आसिफ रियाज अली अन्सारी (३२, हबीबनगर टेका) आणि अजहर मजहर पटेल (२४, दुध डेअरी चौक, टेका) यांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

तस्करीचे मास्टरमाइंड मोहम्मद आमिर, आमिर खान आतिक खान (मुंबई) आणि यश पुनयानी (कल्याणेश्‍वर मंदिराजवळ, महाल) हे तिघे फरार आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील फुलारी, डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या पथकाने केली.