नागपूर : एक लाख रुपयांत तीन लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून राज्यभरात कोट्यवधीने गंडा घालणारी टोळीला डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. टोळीचा म्होरक्या फरार झाला असून तिघांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. 10) पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहायक पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी प्रतापनगर हद्दीत खामला रोड, सीतानगर, शनिवार बाजार नागपूर येथे शैलेश भय्याजी रणदिवे (30, वैशालीनगर, पाचपावली), कौस्तुभ चंद्रकांत टिकले (27, कामगारनगर) नितीन ऊर्फ लखन रूपचंद लोखंडे (28, रा. केळापूर दहेगाव, जि. वर्धा) यांना अटक केली होती. तर टोळीचा म्होरक्या संघपाल गाणार हा फरार झाला होता. ही टोळी गुंतवणुकीच्या तिप्पट बनावट नोटा पुरविण्याचे आमिष दाखवत होती. कुणी पैसे घेऊन आल्यास तोतया पोलिसांचा छापा घालून त्याला लुटत होती. पोलिसांना पैसे द्यावे लागतात, अन्यथा अटक होईल, अशी भीती घालून पैसे उकळत होती.
बदनामीपोटी हेरलेला सावज पैसे देऊन स्वतःची सुटका करून घेत होता. अशाप्रकारे संघपाल गाणारने नागपूर पोलिस दलातील काही पोलिस कर्मचाऱ्यांना टोळीत सहभागी करून घेतले होते, अशी माहिती आहे. बनावट नोटांचा व्यवहार होत असताना पोलिस छापा घालत होते. त्यानंतर लुटलेला माल आपापसात वाटून घेतला जात होता. कौस्तुभ टिकले याच्या खिशातून एका वृत्तपत्राचे ओळखपत्रही पोलिसांना मिळाले आहे.
अधिक वाचा : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या