नागपूर: स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या उपराजधानीचा क्रमांक देशातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत मात्र ३१व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, अमरावती शहराने १६ वा क्रमांक पटकावत या यादीत आघाडी घेतली आहे. आज ३१ व्या क्रमांकावर असलो म्हणून काय झाले, मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांसारखी विकासकामे पूर्ण झाल्यानंतर आपले शहर सर्वच विभागात आघाडी पटकावेल, असा विश्वास नागपूर करांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने भारतातील राहण्यायोग्य शहरांची यादी सोमवारी प्रसिद्ध केली. या यादीत महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराने ३१वा आणि अमरावती शहराने १७ वा क्रमांक पटकावला. देशातील १११ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. शहरांची निवड करताना संस्था, प्रशासन, सामाजिक, पायाभूत सुविधा यात शिक्षण आणि आरोग्याबरोबरच आर्थिक घटक आणि पायाभूत सुविधा या घटकांचा विचार करण्यात आला. हिरवळीच्या बाबतीत उपराजधानी ही देशातील पहिल्या पाच शहरात आहे. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अशीही या शहराची ओळख आहे.
गेल्या चार-पाच वर्षांत स्मार्ट सिटीच्या दिशेने धावणाऱ्या या शहरात माझी मेट्रोची वेगवान वाटचाल सुरू आहे. शहराचे रस्ते देखील कात टाकत असून डांबरीकरणाऐवजी त्याचे सिमेंटीकरण होत आहे. त्यामुळे शहरात धूळ आदींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मात्र, एवढा त्रास होऊनही नागपूरकरांनी कधीच ओरड केली नाही.
याउलट प्रशासनाला सहकार्य करण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे. विकासाच्या प्रक्रियेत शहर असल्याने हे सर्व होणारच तरीही राहण्यायोग्य शहरांच्या सर्वेक्षणात सहभागी होण्यास उपराजधानी तयार झाली आहे. अलीकडेच स्वच्छ सर्वेक्षणातही उपराजधानीचा क्रमांक माघारला होता.
शहरातील लोकांचे जीवन सहज आणि चांगले कसे बनवता येईल, या दृष्टिकोनातून केंद्राने हे सर्वेक्षण केले. चार मुख्य मानकांव्यतिरिक्त १५ उपश्रेणी आणि ७८ संकेतांच्या आधारावर हे वर्गीकरण करण्यात आले.
निकषांमध्ये पहिल्या दहात नागपूर नाहीच
या सर्वेक्षणाकरिता चार मुख्य मानकांमध्ये सामाजिक या मानकात विदर्भातील अमरावती हे शहर सातव्या क्रमांकावर आहे. मात्र, या चार मानकांमध्ये एकाही मानकात पहिल्या दहाच्या आत नागपूरचा समावेश नाही. विशेष म्हणजे, एकूणच सर्वेक्षणात अमरावती शहराने नागपूरपेक्षा १४ क्रमांकांनी आघाडी घेतली आहे.
अमरावतीकरांनी विकासाला साथ दिली
अमरावती शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हे शहर शैक्षणिकदृष्टय़ा विकसित झाले आहे. सामाजिक बांधीलकी आणि जातीय सलोखा कायम राखण्यासाठी अनेक समाजधुरिणांनी आजवर कार्य केले आहे. त्यामुळेच अमरावती शहर नावारूपास आले आहे. शहरातील सामाजिक संस्था आणि राजकीय संघटनांनी चांगले काम केल्यास शहराचा क्रमांक आणखी उंचावला जाऊ शकतो. शहराच्या सर्वागीण विकासासाठी नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण असते, अमरावतीकरांनी विकास प्रक्रियेला साथ दिल्याने ही कामगिरी साध्य झाली आहे.
नागपूरकरांनी घाबरण्याचे कारण नाही
शहरात विकास कामे खूप सुरू आहेत. मागील स्वच्छतेच्या सर्वेक्षणातही उपराजधानी माघारली होती. तीन वर्षांनंतर जेव्हा रस्त्यांचे काम पूर्ण होईल, मेट्रो धावू लागेल, त्यावेळी नक्कीच नागपूर पहिल्या क्रमांकाचे शहर असेल. त्यामुळे सर्वेक्षणात माघारले म्हणून घाबरण्याचे कारण नाही.