नागपूर: जिल्ह्यात दररोज सात ते साडेसात हजार नव्या करोनाबाधितांची नोंद होत असली तरी गेल्या काही दिवसांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी दिवसभरात ६ हजार ९८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे या आजारातून मुक्त होण्याचे प्रमाण ७९.१० टक्क्यांपर्यंत गेले आहे. दुसरीकडे दिवसभरात जिल्ह्यात ७ हजार ४९६ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. तर ८९ मृत्यू नोंदवण्यात आले.
आतापर्यंत ३ लाख १६ हजार ३९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या ‘रिकव्हरी रेट’ वाढला असल्याचे दिसते. गुरुवारी दिवसभरात शहरात ४ हजार ४२२, तर ग्रामीणमध्ये ३ हजार ६७ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजार ६२७पर्यंत गेली आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूचा आकडा अजूनही चिंताजनक ठरत आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे एकूण ७ हजार ३०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात गुरुवारी ८९ मृत्यू नोंदवण्यात आले. यात शहरात ४९, तर ग्रामीणमधील ३३ रुग्णांच्या मृत्यूचा समावेश होता. जिल्ह्याबाहेरील सात रुग्णांच्या मृत्यूचाही यात समावेश आहे. वर्षभरात शहरात करोनाबाधितांच्या ४ हजार ४४१, तर ग्रामीणमध्ये १ हजार ८१४ रुग्णांच्या मृत्यूचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्याबाहेरीर १ हजार ४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
नागपूरची स्थिती
बाधित : ७,४९६
मृत्यू : ८९
बरे होऊन परतलेले : ६,९८४
अॅक्टिव्ह रुग्ण : ७७ हजार ६२७