नागपूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील प्रचंड वाढले आहेत. त्यातच रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन रुग्णांना मिळत नाही. रेमडेसिव्हिर इंजेक्शनबद्दल खूप बोलले जात असले तरी हे इंजेक्शन नेमके दिसते कसे हेच लोकांना माहित नाही आणि काही भामटे याच अज्ञानाचा फायदा उचलत कोरोनामुळे अडचणीत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची लुबाडणूक करत आहेत. मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी असाच एक खेळ नागपूर पोलिसांच्या कारवाईमुळे उघडकीस आला आहे.
रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या रिकाम्या बॉटलमध्ये चक्क पाणी घालून विकणाऱ्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी गजाआड केले आहे. अटक झालेल्या तिघांमध्ये एका रुग्णालयाचे दोन एक्स-रे टेक्निशियन असून एक वाहन चालकाचा समावेश आहे. तिघांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या काही रिकम्या बाटली मिळवून त्यामध्ये चक्क पाणी घालून विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. काही रुग्णांना 28 हजार रुपयात प्रति इंजेक्शनप्रमाणे विक्रीही केली होती. एका दक्ष नागरिकाने पोलिसांना मिरची बाजारजवळ ही टोळी पाणी मिश्रित काही बनावट इंजेक्शन घेऊन येत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी टोळीला कोरोनाबाधित रुग्णांच्या काही नातेवाईकांना हे पाणीचे इंजेक्शन विकताना रंगेहात अटक केली आहे.
मात्र, रेमडेसिविर इंजेक्शन मुळात पावडर स्वरूपात असते. मात्र हे भामटे तेच इंजेक्शन द्रव स्वरूपात विकत होते. त्यामुळेच एका दक्ष्य नागरिकाच्या लक्षात ही बनवेगिरी आली आणि त्याने पोलिसांना माहिती देत रुग्णांच्या जीवाशी सुरु करण्यात आलेले हे खेळ उजेडात आणले आहे. अटक झालेल्या आरोपींची नावे अभिलाष पेटकर आणि अनिकेत नंदेश्वर अशी आहेत.