नागपूर: धुळवडीला कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी संपूर्ण शहरात पोलिस बंदोबस्त असतानाच मोक्षधाम घाट परिसरातील सुलभ शौचालयाजवळ गुन्हेगाराची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. ही थरारक घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. लखन पप्पू गायकवाड (वय ३२, रा. तकिया धंतोली), असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन मारेकऱ्यांना अटक केली आहे. चेतन ऊर्फ बाबा मंडल (वय ३०, रा. हिवरीनगर) व तन्मय ऊर्फ भद्या नगराळे (वय ३०, रा. कौशल्यानगर), अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत. या घटनेने धुळवडीला गालबोट लागले. लखन याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह चार गुन्हे दाखल आहेत. चेतन याच्याविरुद्धही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
चेतन याचा चहाचा ठेला आहे तर तन्मय हा चालक आहे. काही दिवसांपूर्वी तन्मय व लखन यांच्यात वाद झाला. लखन याने त्याला ठार मारण्याची धमकी दिली. लखन ठार मारेल, अशी भीती तन्मय याला वाटायला लागली. तन्मय याने चेतन याच्या मदतीने लखन याचा काटा काढण्याची योजना आखली. सोमवारी सायंकाळी दोघेही दारू घेऊन मोक्षधाम घाटजवळील सुलभ शौचालयाजवळ गेले. तेथे त्यांनी लखन याला दारू पाजली. त्यानंतर दोघांनी तलवारीने वार करून लखन याची हत्या केली व पसार झाले. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. मंगळवारी दुपारी तन्मय व चेतनला अटक केली.