नागपूर : शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या बसेस आता सीएनजी गॅसवर परावर्तित करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला आहे. शनिवारी (ता.१७) परिवहन समितीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
बैठकीला स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, उपसभापती प्रवीण भिसीकर, सदस्य नितीन साठवणे, नरेंद्र वालदे, सदस्या अभिरूची राजगिरे, उज्ज्वला शर्मा, विद्या मडावी, वैशाली रोहणकर, अर्चना पाठक, कल्पना कुंभलकर, निगम सचिव हरिश दुबे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, वरीष्ठ लेखाधिकारी श्री.कावळे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, अरूण पिपरूडे, रामराव मातकर, सुकीर सोनटक्के, विनय भारद्वाज प्रामुख्याने उपस्थित होते.
येत्या २६ जानेवारीपासून मनपाच्या मालकीच्या ५० बसेस सीएनजी गॅसवर धावणार आहेत. यामुळे शहरातील प्रदूषण कमी होईल. यासोबतच मनपाचा आर्थिक भार कमी होणार आहे. सद्यस्थितीत वाढत्या डिझेलचे दर बघता महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. नागपूर महानगरपालिकेने शहर बसच्या संचालनासाठी २०१० मध्ये जेएनएनयुआर अंतर्गत तीन डिझेल बस ऑपरेटरांना प्रत्येकी ७९ बसेस दिलेल्या होत्या. महानगपालिकेचा कुठलाही आर्थिक खर्च वाढणार नसल्याची माहिती सभापती बंटी कुकडे यांनी दिली.
यानंतर बैठकीमध्ये भंगार बसेसच्या लिलावासंदर्भात चर्चा करण्यात आली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सभापती बंटी कुकडे यांनी दिली.
अधिक वाचा : आता मनपाला मिळणार वर्षाकाठी १०३८ कोटी जीएसटी अनुदान