नागपूर : मध्यंतरी अजनी स्थानकावर हलविण्यात आलेली नागपूर-मुंबई- नागपूर दुरंतो एक्स्प्रेस २० फेब्रुवारीपासून पुन्हा नागपूर स्थानकावरून धावणार असून, ही गाडी समाप्तही नागपूरलाच होईल.
१२२८९- १२२९० नागपूर-मुंबई-नागपूर दुरंतो ही गाडी मुळात सुरूच नागपूर स्थानकावरून झाली होती. त्यातही नागपूर स्थानकावरील वैशिष्ट्यपूर्ण होम प्लॅटफॉर्मवरून ही गाडी सुटायची. सुरुवातीच्या काळात तर या प्लॅटफॉर्मवरून सुटणारी ही एकमेव गाडी होती. मध्यंतरी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर अॅप्रॉन दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने नागपूर स्थानकावरील काही गाड्या अजनी, बल्लारशा, इतवारी येथे हलविण्यात आल्या होत्या. त्याचवेळी दुरंतो अजनी स्थानकावर हलविण्यात आली होती. अॅप्रॉनचे काम पूर्ण झाल्यावर या गाड्या पूर्ववत नागपूर स्थानकावर येतील, असे त्यावेळी सांगितले जात होते.
जवळपास महिनाभर हे काम सुरू होते. या काळात दुरंतो अजनीवरून सुटायची. नागपूरवरून मुंबईला जाण्यासाठी दुरंतो ही सर्वाधिक लोकप्रिय गाडी आहे. त्यामुळे या गाडीला नेहमीच गर्दी असते. रेल्वेने सुरुवातीला ही गाडी अजनीला नेल्यानंतर अनेक प्रवासी नागपूर स्थानकावर यायचे व येथे आल्यावर त्यांना गाडी अजनीवरून सुटणार असल्याचे कळायचे. त्यामुळे प्रवाशांची बरीच धावपळ होत होती. दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील अॅप्रॉनचे काम पूर्ण झाले आणि ज्या गाड्या नागपूरवरून अन्यत्र गेल्या होत्या, त्या नागपूर स्थानकावर परत आल्या तरी दुरंतो मात्र अजनीवरूनच सुटत होती.
त्यामुळेच ही गाडी नेहमीसाठी अजनीवरून सुटणार असल्याचे बोलले जात होते. नागपूर स्थानकावरील भार कमी करण्यासाठी काही गाड्या अन्यत्र हलविण्याची गरज आहे. त्याचा भाग म्हणून दुरंतो अजनीवरून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सारे प्रायोगिक स्तरावरच सुरू होते. शहरातील प्रवाशी संघटनांनी दुरंतो अजनीवरून चालविण्याला विरोध केला होता. अलीकडेच भारतीय यात्री संघाने डीआरएमना यासंबंधीचे निवेदन देऊन ही गाडी नागपुरातूनच चाललावी, अशी मागणी केली होती.
नागपुरात ज्या प्लॅटफॉर्मवरून ही गाडी सुटते तो होम प्लॅटफॉर्म वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता २० फेब्रुवारीपासून म्हणजे गुरुवारपासूनच दुरंतो नागपुरातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून आपल्या जुन्याच वेळेनुसार सुटणार असल्याचे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कळविले आहे.