नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या जागेवर विकसित होणार असलेल्या ऑरेंज सिटी स्ट्रीटमधील स्थापत्य बांधकामासह विकासाची जबाबदारी नागपूर मेट्रो कार्पोरेशन लिमिटेड कंपनीने स्वीकारावी. यासोबतच नेताजी मार्केटचा विकास तसेच नागपूर रेल्वे स्थानकासमोरील पूल पाडून रस्ता रुंदीकरणाची आणि परिसराच्या विकासाचीही जबाबदारी नागपूर मेट्रोने स्वीकारावी. यासाठी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय रस्ते परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
नागपूर महानगरपालिका सिव्हील लाईन मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात नागपूर शहरातील प्रस्तावित विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ना. नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.
बैठकीला महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपाचे स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आमदार कृष्णा खोपडे, मनपाच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीचे सभापती अभय गोटेकर, नागपूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रृजेश दीक्षित, जिल्हाधिकारी तथा नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, मनपाचे उपायुक्त नितीन कापडणीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, राजेश भूतकर, नासुप्रचे महाव्यवस्थापक अजय रामटेके, नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, ‘साई’च्या समन्वयक राणी द्विवेदी, राष्ट्रीय महामार्ग ॲथॉरिटी, रेल्वे, राज्य महामार्ग, मेट्रो व संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, ऑरेंज सिटी स्ट्रीट हा प्रकल्प ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचे काम रखडले आहे. या प्रकल्पातील संपूर्ण बांधकाम नागपूर मेट्रो करेल. नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने या प्रकल्पातील व्यावसायिक आणि रहिवासी जागांच्या विक्रीसाठी एकत्रित ‘पॉलिसी’ तयार करण्यात यावी. येथील दर बाजार दरापेक्षा कमी असतील, याची काळजी घ्या, असेही निर्देश ना. गडकरी यांनी दिले. ही पॉलिसी तातडीने तयार करा. शहरातील सर्व डॉक्टर्स, व्यापारी व अन्य लोकांची एक बैठक आयोजित करून तेथे या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात यावे. त्याची योग्य प्रकारे मार्केटिंग करून सुंदर प्रकल्प नागपूरकरांना देण्यात यावा, असेही ते म्हणाले.
या प्रकल्पासंदर्भातील प्राथमिक माहिती कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी दिली. तेथे जयप्रकाश नगर मेट्रो स्थानकाला लागून ‘मेट्रो मॉल’ बनविण्यात येईल. त्याचे डिझाईन तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकासमोरील पूल २५ सप्टेंबरनंतर पाडणार!
नागपूर रेल्वे स्थानक परिसर सुशोभित करणे, वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर करणे यासाठी त्या परिसराच्या विकासाचीही जबाबदारी मेट्रो रेल कार्पोरेशनवर सोपविण्यात आली. या परिसराच्या विकासाचे संकल्पचित्र नागपूर मेट्रोने ना. गडकरी यांच्यापुढे सादर केले. या नियोजनाची प्रशंसा करीत गणेशोत्सवानंतर २५ सप्टेंबरपासून रेल्वे स्थानकासमोरील पूल तोडण्याचे कार्य हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुंजे चौकालगत असलेल्या नेताजी मार्केटचाही विकास नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनने करावा. त्यातून होणाऱ्या मिळकतीतील ५० टक्के नफा नागपूर महानगरपालिकेला द्यावा, असेही निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
‘साई’साठी निधीची उपलब्धता करा!
स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) अंतर्गत वाठोडा येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाच्या मार्गातील जवळपास सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. त्याचे काम सुरू करण्यासाठी मायनिंग फंडातून ३० कोटींची उपलब्धता करून देण्याचे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिले. यासोबतच ३० कोटी केंद्र शासनाकडून प्राप्त होतील. यातून तातडीने ‘साई’चे कार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याच परिसरात सिम्बॉयसीस सह रेमंडच्या शाळेकरिता आठ एकर जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कॉटन मार्केट, संत्रा मार्केट, गोल बाजारचा आढावा
नागपुरातील कॉटन मार्केट, संत्रा मार्केट, गड्डीगोदाम येथील गोल बाजार विकासाचा प्रकल्पही नागपूर मेट्रोकडे सोपविण्यात आला आहे. या कार्याच्या प्रगतीचा आढावा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्याकडून घेतला. ही एकूण २५ एकरची जागा असून १५०० लोकांचे पुनर्वसन करावयाचे आहे. त्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती श्री. दीक्षित यांनी दिली. पुनर्वसनाच्या संदर्भात एक ‘फॉर्म्यूला’ तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जरीफटका येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम तातडीने होणार!
केंद्रीय रस्ते निधीतून नागपुरात इटारसी रेल्वे लाईनवरील जरीफटक्याला जोडणा-या रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन लवकरात लवकर आटोपण्याचे निर्देश ना.नितीन गडकरी यांनी दिले. या निधीतून नागपूर शहरात चार रेल्वे उड्डाण पुलाचे काम होणार आहे. जरीफटका येथील गरज लक्षात घेता हे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी दिले.
अंबाझरी, फुटाळा, तेलंगखेडी सौंदर्यीकरण तातडीने सुरू करा!
अंबाझरी उद्यान विकासाकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे सोपविण्यात येणार आहे. मात्र, तसे न करता नागपूर महानगरपालिकेनेच अंबाझरी उद्यानाचा विकास करावा. फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरचा प्लान तयार आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. तेलंगखेडी उद्यानातील कृषी कन्व्हेंशन सेंटरचे कार्य आणि विवेकानंद स्मारक येथे लाईट ॲण्ड साऊंड शो या सर्व कामांची सुरुवात तातडीने करा, असेही निर्देश ना. नितीन गडकरी यांनी बैठकीत दिले. या सर्व कामासोबत नागपूर शहरातील डी.पी. रोड, विरंगुळा केंद्र, उद्यानातील ग्रीन जीम आदींचा आढावाही ना. गडकरी यांनी घेतला.
अधिक वाचा : शालेय पोषण आहार योजना से दाल गायब, नहीं है सरकार का ध्यान