नागपूर– निवडणुकीत ईव्हीएम द्वारे गैरप्रकार होत असल्याचे सांगत भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्ष ईव्हीएमला विरोध करत आहेत. निवडणुका परत मतदान पत्रिकांद्वारेच घेण्यात याव्या, अशी मागणी ते करत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एम-३’ या नव्या ईव्हीएमचा उपयोग आगामी लोकसभा निवडणुकीत करण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. एस. घुगे यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘एम-३’ या १५,००० ईव्हीएम बंगळुरूहून आणल्या जात आहेत. ‘एम-३’ मध्ये व्हीव्हीपॅट लावण्याची सुविधा आहे. ३० जुलैला त्या नागपुरात येत आहे. यात ९,४३६ बॅलेट युनिट व ५,४८६ कंट्रोल मिळून १४,९२२ ईव्हीएम आहेत. जिल्हा निवडणूक विभागाकडे जुन्या १५ ते १६ हजार ईव्हीएम असून १ हजार बिहारच्या स्थानिक निवडणुकांसाठी पाठवल्या जातील. उर्वरित भंगारात काढण्यात येईल. ईव्हीएमचा उपयोग ३ निवडणुकांपेक्षा जास्त करता येत नाही. सध्या असलेल्या ईव्हीएमचा २००६ पासून वापर होत आहे.
लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळ्या ईव्हीएमचा वापर केला जातो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएममध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे इनबिल्ट मेमरीचा उपयोग केला जातो. तथापि राज्यात होणाऱ्या निवडणुकीत मेमरी चिप लावलेली असते.
“एम-३’ मध्ये कोणी छेडछाडीचा प्रयत्न केल्यास मशीन फॅक्टरी मोडमध्ये जाते. त्या नंतर मशीन फॅक्टरीत नेऊनच दुरुस्त होऊ शकते. या ईव्हीएममध्ये बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट “एम-३’ चेच लागेल. २०१४ च्या लोकसभा िनवडणुकीपेक्षा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत नवीन ३ लाख ४४४ हजार मतदारांची वाढ झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात २० लाख ७७ हजार ५८३ आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात १८ लाख ४१ हजार ७३४ मतदार आहेत.
हेही वाचा : व्हाईस ऑफ विदर्भ’च्या अंतिम फेरीसाठी २३ क्लावंतांची निवड