नागपूर :- जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने सेव्हन स्टार हॉस्पीटलच्या सहकार्याने गणेश नगर नंदनवन परिसरातील महावीर उद्यान येथे आयोजित आरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटक आमदार गिरीश व्यास होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर शेखर सावरबांधे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र भाजपचे महामंत्री आमदार रामदास आंबटकर, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, कोलकाता भाजपचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीनारायण ओझा, नगरसेविका नेहा वाघमारे, डॉ. सदाशिव भोले, जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष मनीष मेश्राम, सचिव तुषार महाजन उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी भारत मातेच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी बोलताना आ. गिरीश व्यास म्हणाले, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांची काळजी घेण्याचा हा प्रयत्न आहे. या शिबिरातून हृदयरोग अथवा अन्य दुर्धर रोगाचे रुग्ण आढळल्यास त्यांना शासनाच्या माध्यमातून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमदार रामदास आंबटकर म्हणाले, रुग्णसेवा म्हणजे ईशसेवा असते. नागपूर शहरातील विविध परिसरात जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे असे आरोग्य शिबिर राबवून त्यांना उत्कृष्ट आरोग्यसेवेचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. जिव्हाळा फाऊंडेशनच्या या कार्यात आपण नेहमी सोबत असू, असा विश्वास त्यांनी दिला.
आमदार सुधाकर कोहळे म्हणाले, नागपूर शहरातील तळागळातील माणसांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आमचे सतत प्रयत्न आहेत. ‘जिव्हाळा’ सारख्या संस्थांची यात मोठी मदत होती. वृक्षारोपणाच्या कार्यातही जिव्हाळा फाऊंडेशनचा वाटा मोठा आहे. त्यांच्या कार्यास आपल्या शुभेच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने आमदार गिरीश व्यास यांच्या हस्ते आमदार रामदास आंबटकर हे विधानपरिषदेवर निवडून आल्याबद्दल आणि आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह त्यांच्याही वाढदिवसानिमित्त दोघांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. सदाशिव भोले यांचाही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
१ जुलै हा ‘डॉक्टर डे’ असल्यामुळे आरोग्य शिबिराच्या निमित्ताने उपस्थित सर्व डॉक्टरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जिव्हाळा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष चंदू धांडे यांनी केले. यानंतर आयोजित आरोग्य शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी आपल्या विविध तपासण्या करवून घेतल्या. कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी राजू तितरे, अजय पाठक, डॉ. सुमित पैडलवार, अक्षय ठाकरे, लता होलघरे, विनोद कोटांगळे, मिथून हटवार, निखिल कावळे, अभिजित सरोदे, जय नांदुरकर, अंगद जळूरकर, योगिता धानोरकर, अश्विन बांगडे, सिद्धेश झलके, ऋषिकेश हिंगे, अनुज शहारे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : जलयुक्तशिवार योजने मुळे पाणीसाठ्यात वाढ, घटली टॅंकरची संख्या