नागपूर: राज्याच्या नकाशावर करोना प्रादुर्भावाचे हॉट स्पॉट म्हणून पुढे येत असलेल्या उपराजधानीसाठी रविवारचा दिवस नागपूरकरांच्या काळजात धडकी भरविणारा ठरला. दिवसभरात १४ जणांना करोना विषाणूची लागण झाल्याच्या धक्यातून शहर सावरलेही नव्हते. तोच अवघ्या काही तासांत यात आणखी सहा जणांची वाढ झाली. त्यामुळे एकट्या नागपुरातील करोना बाधितांचा दिवसभरातील आकडा १४ वरून थेट २० वर जाऊन थांबला आहे. हा विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील करोना बाधितांचा उच्चांकी आकडा ठरला आहे.
त्यामुळे नागपूरातील करोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा ४१ वरून ४७ वर गेला आहे. अर्धशकताच्या दिशेने ही वाढती संख्या नागपूरकरांच्या चिंतेत भर घालणारी आहे. यातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे रविवारीमध्यरात्री प्राप्त अहवालात करोना विषाणूचा नव्याने अंश सापडलेली ४२ वर्षीय महिला आणि १४ वर्षीय मुलगा १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सतरंजीपूरा येथील रहिवासी आहेत. त्यामुळे ही साखळी गेल्या रविवारी दगावलेल्या करोना बाधिताच्या सहवासाशी जोडली जात आहे. गेल्या सात दिवसांत या साखळीत आणखी किती जण जोडले गेले, याचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपुरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील करोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. सुरुवातीला यवतमाळ येथील आठ, त्यानंतर अकोल्यातील सात, बुलडाण्यातील पाच करोना बाधितांमध्ये एकाच दिवशी वाढ झाली होती. या घटनाक्रमात रविवारी नागपूरच्या साखळीने भर घातली. शहरात एकाच दिवशी करोनाची लागण झालेल्यांच्या संख्येत १४ ची भर पडली. या साखळीची जोडही सतरंजीपूरातील बाधिताशी जुळली असताना यात अजून तिन जण वाढले. त्यामळे नागपुरातील बाधितांची संख्या ४७ वर गेली आहे.
मोमिनपुरा, सतरंजीपुरा हे भाग आता करोनाबाधितांच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरत आहेत. शिवाय रविवारी सकारात्मक आलेल्यांपैकी अनेक जण हे आमदार निवासातल्या संस्थात्मक एकांतवासातले होते. मधल्या काळात चाचण्यांची साधने अपुरी असल्याने त्यांचे निदान थांबले होते. आता निदान चाचण्यांच्या पायाभूत सुविधा वाढल्या आहेत. त्यामुळे बाधितांचे निदान होऊन आकडा देखील वाढण्याची जोखीम दिवसागणिक वाढत आहे. शिवाय मालधक्का रोड, अमिया शंकर शाळा, मासूरकर चौक, मालधक्का रोडवरील हॉटेल मदिनाचा परिसर यंत्रणेच्या रडारवर आला आहे.
Also Read- नागपुरात एकाच दिवसात १४ नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण