नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी 61 हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झाल्या आहेत. आजपासून लसीकरणाला गती आली असून पुढील काळात आणखी लसी केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज पुन्हा चार टँकर वायुदलाच्या विशेष विमानाने ओडिसा राज्यातील अंगूळ येथील स्टील प्लांटला रवाना करण्यात आले. उदया सायंकाळपर्यंत काल पाठविण्यात आलेले चार ऑक्सिजन टँकर नागपूर शहरात पोहोचण्याची अपेक्षा आहे.
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील लसीकरणाला पुन्हा गती मिळाली असून काल रात्रीपर्यंत 61 हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये 45 हजार कोव्हीशिल्ड तर 16 हजार कोव्हॅक्सिनचा समावेश आहे.
नव्याने प्राप्त झालेल्या 16 हजार कोव्हॅक्सिनमधून ग्रामीण भागातील सावनेर, कामठी येथील केंद्रावर तर नागपूर शहरातील महाल, छापरू स्कूल, मानेवाडा यूपीएससी या केंद्रावर 18 वर्षावरील तरुणांचे लसीकरण केले जात आहे. अन्य 45 हजार लसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.
ऑक्सिजन टॅंकर
दरम्यान,जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता ओरीसा राज्यातून ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. काल चार टँकर एअरफोर्सच्या विमानाने रवाना झाले होते. आज पुन्हा चार टँकर सायंकाळी सात वाजता रवाना होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ओडीसा राज्यातील भुवनेश्वर नजीकच्या अंगूळ येथील स्टील प्लांट मधून नागपूरसाठी ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. नागपूरला उद्या सायंकाळपर्यंत काल पाठविण्यात आलेले चार टँकर रस्ते मार्गाने पोहोचणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पाठविण्यात आलेले टॅंकर उद्या पर्यंत पोहोचतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन
जिल्ह्यात आज एकूण 4 हजार 485 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाले. शहरातील 156 तर ग्रामीणमधील ४९ शासकीय व खाजगी रुग्णालयांना रेमडेसिवीरचे वाटप करण्यात आले. अन्न, औषध व प्रशासन, यांचे अधिकारी-कर्मचारी यांनी वितरण तक्त्यानुसार वाटप होत असल्याची खातरजमा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड-19 वैश्विक साथीमध्ये काम करणारे फ्रंटलाईन वर्कर्स उदाहरणार्थ आरोग्य सेवा, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस, महसूल, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन, परिवहन इत्यादी विविध आस्थापनांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 10 टक्के कोटा राखीव ठेवण्याचे निर्देश असल्याने त्यांना प्राधान्याने रेमडेसिवीर देण्यात येते.
आज टॉसिलीझुमॅब प्राप्त झालेले नाही. कालपर्यंत 105 डोजेस प्राप्त झाले होते. त्याचे नियमित वितरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑक्सिजन पुरवठा
6 मे रोजी जिल्ह्यात 106 मेट्रीक टन ऑक्सिजन प्राप्त झाला. जिल्ह्यात भिलाई, रायपूर, नागपूर, येथील ऑक्सिजन फिलींग सेंटरवरून ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील जगदंबा, भरतीया, आदित्य, आसी, रुक्मिणी या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्लांटमधून 138 मेट्रीक टनाची क्षमता आहे. त्यापैकी आज 76 मेट्रीक टनची गरज असून 52 मेट्रीक टन ऑक्सिजनचे वितरण झाले आहे तर मेयो, मेडीकल, शालीनीताई मेघे, लता मंगेशकर हॉस्पीटल, ॲलेक्सीस हॉस्पीटल, अवंती, क्रिम्स, ऑरेंजसिटी, शुअर टेक, वोक्हार्ट, आशा हॉस्पीटल कामठी, 71 मेट्रीक टनची गरज असतांना 80 मेट्रीक टन ऑक्सिजन वितरीत करण्यात आला आहे. अशारितीने आवश्यक ऑक्सिजन वितरण आज झाले आहे तर चंद्रपूर, वर्धा, भंडारा, सावंगी, छिंदवाडा, अकोला, आदी ठिकाणी देखील आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.