नागपूर : ट्युशन क्लासेस संचालकाची १६ लाखांनी फसवणूक

Woman bank clerk booked for Rs 97.63 lakh fraud in Nagpur

नागपूर : ट्युशन क्लासेस संचालकाला आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी १६ लाखांनी गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ठकबाजांनी त्याला राजकीय आणि सरकारी अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही ठकबाज तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शिवेश दिलीप कावळे (वय २९), कृपेश दिलीप कावळे (वय २७ रा. श्रीकृश्ण नगर, बेसा रोड) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत गजानन माडेवार ( वय ४९ रा. प्लॉट नं. ४१, उदय नगर, मानेवाडा रिंग रोड) हे विविध क्लासेसमध्ये विद्यार्थी मिळवून देण्यासाठी समुपदेशन करतात. यापूर्वी त्यांनी उदयनगर परिसरात दहावी आणि बारावीचे क्लास सुरू केले होते. मात्र,ते कोरोना काळात बंद झाले. त्यामुळे त्यांनी ईतरत्र पैसे गुंतविण्याचे ठरविले. दरम्यान त्यांची भेट २७ एप्रिल २०२१ मध्ये शिवेश दिलीप कावळे आणि कृपेश कावळे यांच्याशी झाली.

आरोपीनी स्वतःचे ‘टॅग्स कलेक्टिव्ह इंडिया प्रा लि.’ या नावाने कार्यालय असून ते संचालक असल्याचे सांगून कंपनीचा भागधारक होऊन आकर्षक परताव्यासह अधिक नफा देण्याचेही आमिष दिले. यावरुन माडेवार यांनी आरोपीना टप्प्या-टप्‍प्याने १६ लाख ८ हजार रुपये दिले. मात्र, काही दिवसातच त्यांना नफा मिळणे बंद झाल्याने त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे तक्रार दिली. त्यांनी हुडकेश्‍वर पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.

चार लाखांची वसुली

प्रशांत माडेवार यांना आरोपींनी प्रतिज्ञापत्र आणि धनादेशही दिले असल्याचे समजते. त्यातून तक्रारीच्या भीतीने त्यांनी चार लाख परत दिल्याची माहिती आहे. मात्र, त्यानंतर दोघेही माडेवार यांनी पोलिसात गेल्यास बघून घेण्याची धमकीही देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मंत्रालयात ओळखी असल्याची बतावणी

फसवणूक करणाऱ्या दोन्ही ठकबाज भावांचे शहरासह राज्यातील नेत्यासोबतचे फोटो आहेत. त्याचा आधार घेत, त्यांनी माडेवार यांना भुरळ घातली. त्यामुळे माडेवार यांचा विश्‍वास बसला. इतकेच नव्हे तर मंत्रालयातील कामेही या ओळखीतून करीत असल्याचे त्यांनी भासविले. त्यातून त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या दोघांवरही इतर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून जिथे कार्यालय होते, तेथील मालकाचीही त्यांनी फसवणूक केल्याची माहिती आहे.