नागपूर : तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करीत त्याचा व्हिडीओ फेसबुक व व्हॉट्सअॅपवर अपलोड करणे युवकाला चांगलेच महागात पडले. फेसबुकच्या आधारे पोलिसांनी युवकाचा शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडून दोन तलवारी जप्त केल्या. सिद्धांत दिवाकर चौधरी (वय २४, रा. भिलगाव, यशोधरानगर) असे अटकेतील युवकाचे नाव आहे.
सिद्धांतचा दूधविक्रीचा व्यवसाय आहे. ३० डिसेंबरला त्याचा वाढदिवस होता. त्यादिवशी त्याने तलवारीने केक कापला. याचा व्हिडीओ त्याने फेसबुकवर अपलोड केला व व्हॉट्सअॅप स्टेटसही ठेवले. याबाबत पोलिस उपायुक्त नीलोत्पल यांना माहिती मिळाली. नीलोत्पल यांनी विशेष पथकाला शोध घेऊन युवकाला अटक करण्याचे निर्देश दिले. विशेष पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत डी. अन्नछत्रे, विनोद सोनटक्के, रवींद्र राऊत, मृदुल नगरे यांनी युवकाचा शोध सुरू केला. तलवारीने केक कापणारा युवक सिद्धांत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्या भिलगाव येथील घरी छापा टाकला. घराची झडती घेतली. गोठ्यात लपविण्यात आलेल्या दोन तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. सिद्धांतला अटक केली. त्याला यशोधरानगर पोलिसांच्या स्वाधीन केले.