नागपूर : ‘आपली बस’प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका शहर बससेवा चालवीत आहे. यासाठी खासगी आॅपरेटर नियुक्त करण्यात आले असून, सध्या शहरातील विविध मार्गावर ३७५ बसेस धावतात. परंतु गेल्या काही महिन्यांत डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका महापालिकेच्या परिवहन विभागाला बसत असल्याने, विभागाने टप्प्यामागे दोन रुपये तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव २ जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शहर बसचे भाडे २० टक्के वाढणार आहे.
सध्या प्रवाशांना २ किलोमीटरसाठी ८ रुपये द्यावे लागत होते. आता, त्यांना १० रुपये द्यावे लागेल. महापालिकेच्या परिवहन समितीच्या २१ मार्चच्या बैठकीत दरवाढीबाबत निर्णय घेण्यात आला होता. महापालिका शहर परिवहन सेवेचे संचालन करीत असली तरी रेड बस व ग्रीन बससाठी महापालिकेने चार आॅपरेटर नियुक्त केलेले आहेत. शहरात आॅपरेटरच्या व महापालिकेच्या मालकीच्या २३७ सर्वसाधारण रेड बसेस अशा एकूण ३८७ बसेस धावत आहेत.
महापालिका व आॅपरेटरमध्ये झालेल्या करारानुसार मंजूर निविदांचे दर तसेच डिझेल दर, कर्मचारी वेतन, बसचे सुटेभाग यात वाढ झाल्यास त्याअनुषंगाने वाढीव दर निश्चित करून रेड बस आॅपरेटर्सना मासिक परतफेड करावी लागते. मार्च, २०१७ मध्ये डिझेलचे दर ६२.५७ रुपये प्रति लिटर होते. एप्रिल २०१८ मध्ये ६९.१२ रुपये प्रति लिटर एवढी वाढ झाली; म्हणजे ६.५५ रुपये एवढी प्रति लिटर वाढ डिझेलमध्ये झाली. कर्मचाºयांच्या वेतनातदेखील वृद्धी करण्यात आली. त्यानुसार तीन रेड बस आॅपरेटर्सना मिडीकरिता ४६.९० रुपये व रेड स्टॅन्डर्ड बसकरिता ५२.१६ रुपये प्रति किलोमीटर एवढी परतफेड महापालिकेला करावी लागते. ५ डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१८ पर्यंत ५५ कोटी ६२ लाख १५ हजार ८९५ एवढे उत्पन्न झाले. त्यातुलनेत महापालिकेने रेड बसच्या तीन आॅपरेटर्सला १०८ कोटी ९ लाख ६७ हजार ५२५ रुपये एवढी रक्कम दिली. या काळात ५२ कोटी ४७ लाख ५१ हजार ६३० रुपयांचा तोटा झाला असल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचे परिवहन समितीने म्हटले आहे.
ग्रीन बसची भाडेकपात कशासाठी?
महापालिकेची परिवहन सेवा तोट्यात असल्याने रेड बसच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव आणला आहे. मात्र तोटा असूनही ग्रीन बसच्या भाड्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी दोन रुपयांनी कपात केली होती. तोट्यात असूनही कपात कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.